Vasai school news : वसईतील एका शाळेत शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. उशिरा शाळेत आल्यामुळे सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. या शिक्षेनंतर मुलीची तब्येत बिघडली आणि अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
100 उठाबशा काढल्याची शिक्षा दिल्याने विद्यार्थीनीचा झाला होता मृत्यू
अधिकची माहिती अशी की, 8 नोव्हेंबरच्या सकाळी विद्यार्थिनी शाळेत थोड्या उशिराने पोहोचली. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत शिक्षिकेने तिला उठाबशा काढण्यास सांगितले. शिक्षा घेतल्यानंतर मुलगी घरी परतली, मात्र काही वेळातच तिची प्रकृती खालावू लागली. ताप, थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे स्पष्ट जाणवत होती. कुटुंबीयांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले, पण तिची स्थिती सुधारली नाही. अखेर शुक्रवारी रात्री मुलीने अखेरचा श्वास घेतला.
घटनेची माहिती मिळताच मुंबईतील जे. जे. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची प्राथमिक नोंद केली. मात्र कुटुंबीयांनी शिक्षिकेच्या शिक्षेमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर हा गुन्हा वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. साक्षीदारांची माहिती, विद्यार्थ्यांचे निवेदन आणि कुटुंबीयांची तक्रार तपासल्यानंतर वालीव पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी तिला अटक केली असल्याची माहिती वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.
दरम्यान, या घटनेचा कायदेशीर पाठपुरावा वेगाने व्हावा यासाठी मुंबईतील वकिल स्वप्ना कोदे यांनी थेट बॉम्बे हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, राज्य सरकार तसेच पोलिस महासंचालकांनी स्वतःहून दखल घ्यावी आणि विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून शाळेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
शाळेकडून मात्र विद्यार्थिनीच्या तब्येतीबाबत वेगळा दावा करण्यात आला आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांच्या मते, मुलीची शारीरिक प्रकृती पूर्वीपासूनच कमजोर असल्याची माहिती त्यांच्याकडे होती आणि पालकांना वैद्यकीय उपचाराबाबत सूचना दिल्या होत्या. शिक्षिका मात्र विद्यार्थिनीला इतर मुलांसोबत शिक्षा दिल्याचे सांगत असून तिच्या आरोग्यस्थितीबाबत तिला काहीच माहिती नव्हती, असे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मृत्यू प्रकरणाने पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. वसईतील या घटनेने शिक्षणक्षेत्र हादरले असून तपासाचा पुढील अहवाल येत्या काही दिवसांत समोर येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











