नोकरीसाठी आई बनली कसाई, 20 दिवसांचं बाळ झोपलेलं असताना वैनगंगा नदीच्या पूलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न
Gondia Crime : नोकरीसाठी आई बनली कसाई, 20 दिवसांचं बाळ झोपलेलं असताना वैनगंगा नदीच्या पूलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नोकरीसाठी आई बनली कसाई
20 दिवसांचं बाळ झोपलेलं असताना वैनगंगा नदीच्या पूलावरुन फेकलं
मुलाचा खून करुन अपहरणाचा बनाव रचला, संपूर्ण परिसर सुन्न
Gondia Crime : गोंदिया जिल्ह्यात माणुसकी हादरवणारी घटना उघड झाली आहे. डांगोर्ली परिसरातील 20 दिवसांच्या नवजात बालकाचा खून त्याच्या स्वतःच्या आईने केल्याचे गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसात उघडकीस आणले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बाळ पळवून नेल्याचा खोटा आरोप करून पोलिसांना दिशाभूल करणाऱ्या रिया राजेंद्रसिंह फाये (वय 22) हिला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आईच कसाई ठरल्याचे वास्तव समोर येताच संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
झोपेत असलेल्या बाळाला उचलून नेलं, वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाण्यात फेकलं
अधिकची माहिती अशी की, रियाने 18 नोव्हेंबर रोजी रावणवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा विराजचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. तिने सांगितले की, 17 नोव्हेंबरच्या रात्री एक दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कुणीतरी घरात शिरून झोपेतल्या बाळाला उचलून पळून गेला. तिच्या या फिर्यादीवर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अन्वये तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी यंत्रणेला तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हातात घेऊन वेगाने गुंतागुंत उलगडायला सुरुवात केली.
तपास जसजसा पुढे गेला तसतसे रियाचे वक्तव्य पळवाट काढणारे, विसंगत आणि संशय वाढवणारे निघू लागले. तिने सांगितलेल्या ‘जबरदस्तीने घरात घुसण्याच्या’ कथेला घटनास्थळी कोणताही पुरावा पाठिंबा देत नव्हता. घरातील परिस्थितीही तिच्या कथेशी विसंगत दिसत होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांची चौकशी आणि घटनास्थळावरील सूक्ष्म तपासणी यातून पथकाला स्पष्ट संकेत मिळू लागले की हा गुन्हा बाहेरच्याने केला नसून घरातच घडला. परिणामी संशयाची सुई रियाकडेच फिरली. ताब्यात घेतल्यावर कठोर चौकशीची करताच रियाचा बनाव जास्त काळ टिकला नाही. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने अंगावर काटा आणणारी कबुली दिली. “मला नोकरी करायची होती… बाळ नको होतं. पतीने गर्भपात करू दिला नाही… म्हणून मी ठरवलं त्याला संपवायचं.” तिच्या या कबुलीनं तपास पथकही काही क्षण नि:शब्द झाले.










