गोकूळ कांबळे, रत्नागिरी: पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजे-डॉल्बी सिस्टिमवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांची गुणवत्ता तब्बल 22 वर्षांपूर्वीच रत्नागिरीकरांनी ओळखली होती. 2004 मध्ये गोळप येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बापट यांचा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश होता. या कार्यक्रमाची जुनी वृत्तपत्रीय कात्रणे आणि छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
पुण्यातील डीजे-डॉल्बीविरोधी भूमिकेमुळे चर्चेत
पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवरील बंदीचा मुद्दा मांडल्यामुळे विद्यानंद बापट यांचे नाव चर्चेत आले. या मुद्द्यावर सभेत काही जणांनी विरोध केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षित वातावरणात त्यांना सभागृहाबाहेर नेले.
हे ही वाचा>> 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटाऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
या घटनेनंतर बापट यांच्या भूमिकेची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा सुरू झाली. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, विविध विषयांतील संदर्भांची माहिती, प्रचंड वाचन आणि आकलनशक्ती यामुळे ते अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
2004 मध्येच गोळपमध्ये झाला होता गुणगौरव
विद्यानंद बापट यांच्या गुणवत्तेची दखल आजच नव्हे, तर तब्बल 22 वर्षांपूर्वीच घेण्यात आली होती. रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगर येथे आदर्श युवक मंडळाच्या वतीने 2004 मध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत विद्यानंद बापट यांचाही समावेश होता. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल त्यावेळीच स्थानिक पातळीवर घेतली गेली होती.
पुण्यातून कोकणात आलेल्या बापट कुटुंबाचा शैक्षणिक प्रवास
विद्यानंद बापट यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.
हे ही वाचा>> Exclusive: पुणेच नाही अवघ्या देशभर चर्चा असलेल्या बिनधास्त बापटांची स्फोटक मुलाखत
महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.कॉम.च्या परीक्षेत ते महाविद्यालयात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि सी.ए.ची परीक्षाही दिली.
विद्यानंद बापट यांचे वडील सुहास बापट यांच्या माहितीनुसार, त्यांची अभ्यासातील रुची, वाचनाची आवड आणि आकलनशक्ती यांची जाणीव शालेय जीवनापासूनच शिक्षक आणि ग्रामस्थांना झाली होती.
जुन्या वृत्तपत्रीय कात्रणांमुळे आठवणींना उजाळा
२००४ मध्ये गोळप येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. दैनिक तरुण भारत, दैनिक भैरव टाइम्स यांसह अन्य स्थानिक वृत्तपत्रांमध्ये या कार्यक्रमाची दखल घेण्यात आली होती.
या बातम्यांची छायाचित्रांसह असलेली दोन वृत्तपत्रीय कात्रणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कात्रणांमुळे बापट यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल त्यांच्या गावात अनेक वर्षांपूर्वीच घेतली गेल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
एस. एम. जोशींच्या मूळ गावाची पुन्हा चर्चा
समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे मूळ गाव म्हणून ओळख असलेले गोळप गाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुण्यात डीजे-डॉल्बीच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या भाषिक व बौद्धिक क्षमतेविषयी होत असलेल्या चर्चेमुळे गावातील जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
२००४ मधील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यातील नोंदी आणि सध्या व्हायरल होत असलेली वृत्तपत्रीय कात्रणे यामुळे बापट यांच्या शैक्षणिक प्रवासाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT












