Washim News, जका खान : वाशिम शहरातून प्रशासन व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिममधील मध्यमेश्वर मंदिर परिसरातील सौदागारपुरा भागात ड्रेनेज लाईन पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे गलिच्छ पाणी थेट लोकांच्या घरांमध्ये शिरू लागले होते. या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी अनेकदा नगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!
दरम्यान, ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सैय्यद समीर या प्लंबरच्या घरातही सांडपाणी भरू लागले. समीर यांनी प्रशासनाकडून मदतीची वाट पाहिली, परंतु कोणाकडूनही दखल घेतली गेली नाही. शेवटी, स्वतःच्या मुलांच्या आरोग्याची चिंता आणि घरात वाढणारे पाणी पाहून समीर यांनी स्वतःच जिवाची बाजी लावून गटार साफ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चेंबरचे झाकण उघडून थेट गळ्यापर्यंत सांडपाण्यात उतरून पाइपच्या सहाय्याने साचलेली घाण बाहेर काढली.
हेही वाचा : बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच, आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड
नगरपालिकेचं नालेसफाईत अपयश; सोशल मीडियावर संतापाची लाट
समीर यांच्याकडून हे सफाईचे काम सुरु असताना आसपासचे लोक फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते, परंतु मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. काही काळानंतर समीर यांच्या मेहनतीमुळे पाण्याचा निचरा झाला आणि पाणी वाहू लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मात्र नगरपालिकेचे कर्मचारी आणि संबंधित नगरसेवक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून गटार साफ करण्याची वेळ
स्थानिकांच्या मते, जर प्रशासनाने वेळीच तक्रारींची दखल घेतली असती, तर एका सामान्य नागरिकाला स्वतःचा जीव धोक्यात घालून गटारात उतरण्याची नामुष्की ओढवली नसती. सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकारणावरुन तीव्र निषेध केला जात आहे. 'ही केवळ एका माणसाची मजबूरी नसून, संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे' अशी टीका लोक करत आहेत. एका बाजूला समीर यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे आजही देशाच्या अनेक भागात कोणत्याही सुरक्षेशिवाय लोकांना आणि कामगारांना देखील अशा पद्धतीने नाल्यांमध्ये उतरावे लागते, याबाबत लोक चिंता व्यक्त करत आहेत.
ADVERTISEMENT











