दिल्लीतील नेहरु स्टेडियमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, विदेशातून आलेल्या दोन प्रशिक्षकांचा चावा घेतला

World Para Athletics championship

Mumbai Tak

मुंबई तक

05 Oct 2025 (अपडेटेड: 05 Oct 2025, 12:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीतील नेहरु स्टेडियमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

point

विदेशातून आलेल्या दोन प्रशिक्षकांचा चावा घेतला

World Para Athletics championship : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान दोन विदेशी प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रशिक्षक केनिया आणि जपान येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेने (MCD) स्टेडियम परिसरात चार पथके तैनात केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया हे स्टेडियममधील स्पर्धा क्षेत्राबाहेर आपल्या खेळाडूशी बोलत असताना एक भटका कुत्रा अचानक आला आणि त्यांचा चावा घेतला. त्याचप्रमाणे जपानच्या प्रशिक्षिका मेइको ओकामात्सु आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवत असताना त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला. दोघांनाही तत्काळ वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर सफदरजंग रुग्णालयात नेऊन संपूर्ण उपचार करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे.

महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेडियममध्ये एकूण 21 प्रवेशद्वार आहेत आणि चार पथके आधीच तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून अशा प्रकारची घटना घडू नये. अधिकारी म्हणाले की, 25 सप्टेंबरपासून आतापर्यंत स्टेडियम परिसरातून 22 भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भात येलो अलर्ट जारी

दोन्ही प्रशिक्षकांनी काय सांगितले?

केनियाच्या संघाचे प्रतिनिधी जोएल अतुती यांनी सांगितले की, डेनिस मरागिया यांना “कॉल रूम” जवळ कुत्र्याने अचानक चावा घेतला. कॉल रूम म्हणजे खेळाडू आपल्या स्पर्धेपूर्वी एकत्र येतात तो भाग. घटनेनंतर लगेचच वैद्यकीय पथकाने त्यांना रुग्णालयात नेऊन आवश्यक उपचार केले.

सुप्रीम कोर्टाचा आदेश काय होता?

सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत आणि एनसीआर परिसरात असलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, 22 ऑगस्ट रोजी या आदेशात बदल करण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट केले की, पकडलेल्या कुत्र्यांची प्रथम नसबंदी व लसीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडले जाईल. फक्त रेबीजग्रस्त, संशयित किंवा आक्रमक स्वभावाचे कुत्रे याला अपवाद असतील.

जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन

वैद्यकीय आणि महानगरपालिकेची पथके सतत गस्त घालत असून भटक्या कुत्र्यांवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही घटनेची तात्काळ माहिती संबंधित विभागाला द्यावी. या घटनेमुळे स्टेडियम परिसरातील सुरक्षा आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुलाचं अपहरण केलं अन् आईला ब्लॅकमेल... शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव, नेमकं प्रकरण काय?

    follow whatsapp