26/11 terrorist attack : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शौर्याने लढत वीरमरण पत्करलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला अनंकप तत्वावर सरकारी नोकरी मिळाली आहे. 17 वर्षांपूर्वी वडिलांना गमावलेल्यानंतर शिक्षणासाठी तिने मोठा संघर्ष केलाय. अखेर आज तिच्या प्रयत्नांना यश मिळालंय. अनुष्का प्रकाश मोरे यांची राज्य प्रशासकीय सेवेत औषध निर्माता (गट-ब) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या नियुक्तीसाठी एमपीएससीचे विशेष नियम शिथिल करून मान्यता दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निर्णय घेण्यात आलाय.
ADVERTISEMENT
बलिदानाची दखल घेत राज्य सरकारकडून नोकरीची संधी
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक, पोलीस अधिकारी आणि जवानांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती. त्यावेळी प्रकाश मोरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते आणि त्यांनी दहशतवाद्यांना रोखताना शौर्याने आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या बलिदानाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
अनुष्का मोरे यांनी बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्य विभागाच्या मुंबई शहर कार्यालयात औषध निर्माता (गट-ब) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी एमपीएससीच्या नेहमीच्या नियमांनुसार निवड प्रक्रिया आवश्यक असली तरी, विशेष बाब म्हणून आयोगाने नियम शिथिल करून त्यांना ही संधी दिली आहे.
अनुष्का मोरे यांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्र देण्यात आले असून त्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे 26/11 हल्ल्यात शौर्याने प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीराच्या कुटुंबाचा सन्मान पुन्हा अधोरेखित झाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या या संधीमुळे मोरे कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. “वडिलांनी देशासाठी बलिदान दिले आणि आज त्याच त्यागामुळे मला शासनात स्थान मिळाले, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे अनुष्का मोरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीला मंजुरी देताना म्हटले, “शूर जवानांच्या कुटुंबियांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. अनुष्का मोरे यांची नियुक्ती ही त्यांच्या वडिलांच्या शौर्याला दिलेली खरी आदरांजली आहे.” या निर्णयामुळे 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून, अनुष्का मोरे यांचे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांचा शासकीय सेवेतला प्रवास देशसेवेच्या वारशाला पुढे नेणारा ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
