मुंबई: मायानगरी मुंबई... दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठीत महिला... जिच्या मुली परदेशात नोकरीला... बक्कळ पैसा. एके दिवशी अचानक तिला एक फोन येतो, पोलीस असल्याचं सांगितलं जातं. तुमच्या पैशांचा वापर मनी लाँडरिंगसाठी केला जातो, यामुळं कारवाई होऊ शकते, अटक होऊ शकते, असं सांगून घाबरवलं जातं. याच नंतर सुरु होतो डिजिटल अरेस्टचा खेळ. मग ती 81 वर्षांची महिला ते लोक जसं सांगतील तसं करायला लागते. ती महिला आपली सेव्हींग, एफडी आणि म्युच्युअल फंडमधून एकूण 7.8 कोटी रुपये स्वत:ला पोलीस असं सांगितलेल्या व्यक्तींच्या खात्यात ट्रान्सफर करते.
ADVERTISEMENT
हा सगळा सायबर भामट्यांचा खेळ. मुंबईतील एका वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करत आणि तिची 7 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण सध्या गाजतं आहे.
या डिजिटल अरेस्ट प्रकरणात 81 वर्षीय महिलेवर सायबर भामट्यांनी इतकी भीती घातलेली की, तिने खऱ्या पोलिसांसाठी आपल्या घराचे दरवाजे बंद केले. अखेर पोलीस घरमालकाच्या मदतीने तिच्या घरात घुसले आणि तिला डिजिटल अरेस्टमधून बाहेर काढले. जर पोलिसांनी सतर्कता दाखवली नसती तर या महिलेने आणखी पैसे घालवले असते.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून फोन करते. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला सतत फोन करुन किंवा मेसेजेस पाठवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं, घाबरवण्यात येतं. या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी केली जाते.
हे ही वाचा>> पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन् सगळा खेळच...
बऱ्याच वेळेला व्हिडीओ कॉल करुन पोलीस स्टेशन असल्यासारखं भासवण्यात येतं. तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला जातो आणि तुमची फसवणूक केली जाते. असाच हा एक प्रकार आता मुंबईत समोर आला आहे.
तब्बल 7.8 कोटी रुपयांची फसवणूक
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, 81 वर्षीय महिला दक्षिण मुंबईत एकटीच राहते. तिच्या पतीचे निधन झालं आहे आणि तिच्या दोन मुली परदेशात राहतात. 10 जुलै रोजी सायबर भामट्यांनी तिला पोलीस असल्याचे भासवून फोन केला. भामट्यांनी तिला सांगितले की, काही लोक तिच्या पैशांचा वापर मनी लाँडरिंगसाठी केला जात आहे. मग कारवाईची धमकी देऊन तिला डिजिटल पद्धतीने अटक केली गेली. यानंतर, महिलेने 7.8 कोटी रुपये भामट्यांनी सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केले.
अचानक कोट्यवधी रुपयांचं ट्रान्सफर झाल्यामुळं सायबर पोलीस सतर्क झाले. 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलिसांचे एक पथक महिलेच्या घरी पोहोचले. महिलेने दार उघडले, पण पोलिसांना आत येऊ दिले नाही. यानंतर दक्षिण विभाग सायबर पोलीस स्टेशनचे दुसरे पथक तिथे पोहोचले, पण या महिलेनं गेटही उघडलं नाही. पोलीस तिला ते खरे पोलीस असल्याचे समजावून सांगायचे अथक प्रयत्न करत होते मात्र त्या महिलेला ते पटलंच नाही, कारण सायबर भामट्यांनी त्या महिलेला सांगितलं होते की गेटवर उभे असलेले लोक बनावट पोलीस आहेत, आणि तेच महिलेला खरं वाटलं.
हे ही वाचा>> प्रियकरासाठी पतीला सोडलं अन् त्याच्याकडूनच मिळाला धोका... पीडितेनं घेतला ‘तो’ निर्णय अन् पुढे...
त्यानंतर सायबर पोलिस दलाने घरमालकाची मदत घेतली. खूप समजावून सांगितल्यानंतर महिलेने दार उघडले. त्यानंतर पोलिसांनी तिला सत्य सांगितले. तिला धीर देण्यासाठी त्यांनी तिला तिच्या मुलींशी बोलणं करुन दिलं. मुलीने तिच्या आईशी फोनवर बोलून तिला समजावून सांगितलं. डिजिटल अरेस्ट करुन ठेवले असल्याचं तिला पटवून दिलं. नंतर महिलेने पोलिसांना सांगितले की फसवणूक करणारे पोलिसांच्या वेशात होते.
स्वतःला खरे असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुलाबा पोलीस स्टेशनबाहेरचे काही फुटेजही दाखवले होते, असं सुद्धा महिलेनं सांगितलं.
मग बराच वेळ समजूत काढल्यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्यास सहमती दर्शविली आणि एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या जबाबाच्या आधीच पैसे ट्रान्सफर केल्याच्या आधारे सायबर पोलीस हेल्पलाइन 1930 वर कॉल करण्यात आला होता.
त्यानंतर, कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून महिलेचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले होते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान या घटनेनं खळबळ उडाली आहे. यामुळं आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर असा काही कॉल येत असतील तर घाबरुन जाऊ नका. आपलं बँकेचे डिटेल्स कुणाला देऊ नका. संशय आला तर जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत कळवा किंवा हेल्पलाईन नंबरवर मदत देखील आपण मागू शकता.
ADVERTISEMENT
