Crime News : बाईक चालवण्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद अवघ्या काही मिनिटांत रक्तरंजित हत्याकांडात बदलला. 28 मे रोजी दुपारी साधारण तीनच्या सुमारास 17 वर्षीय सूर्यप्रताप चौहान आणि 19 वर्षीय असद यांच्यात बाईक चालवण्यावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद साधा भांडणाचा प्रकार असल्याचे वाटत होते. पण पुढे काय घडलंय? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात; काकडेंच्या उमेदवारीची Inside Story
“बकऱ्याची कुर्बानी पाहिली आहे का?”
सर्वांना वाटलं दोघांमधील वाद किरकोळ होता. पण काही वेळाने असद तेथून निघून गेला आणि उपस्थित लोकांनाही प्रकरण मिटल्याचे वाटले. मात्र सुमारे अर्ध्या तासानंतर असदने सूर्यप्रतापला फोन करून “बकऱ्याची कुर्बानी पाहिली आहे का?” असा प्रश्न विचारत त्याला कुर्बानी पाहण्यासाठी बोलावले. सूर्यप्रताप आणि त्याचा मित्र आयुष असदच्या सांगण्यावरून तेथे गेले. मात्र एका गल्लीत पोहोचताच असद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना घेरले. त्यावेळी असदच्या वडिलांनीच मुलाला सूर्यप्रतापची “कहाणी संपव” असे सांगून चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर असदने सूर्यप्रतापच्या पोटात चाकू भोसकला. जीव वाचवण्यासाठी आयुष तेथून पळून गेला, तर सूर्यप्रताप रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला.
हेही वाचा : Personal Finance: पोस्टाची कोणती स्कीम तुमच्यासाठी आहे जबरदस्त?
उपचार सुरू असतानाच काही तासांत मृत्यू
हल्लेखोर निघून गेल्यानंतर आयुष पुन्हा घटनास्थळी परतला आणि सूर्यप्रतापला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांत त्याचा मृत्यू झाला. सूर्यप्रताप आणि असद हे दोघेही एकाच परिसरात राहत होते आणि त्यांच्या घरांमध्ये सुमारे 300 मीटरचे अंतर होते. या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आयुषने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये यापूर्वी कोणताही मोठा वाद नव्हता. बकरीदच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणाव वाढू लागला. सूर्यप्रतापच्या घराबाहेर विविध संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले आणि वातावरण तापले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज लागले. या फुटेजमध्ये काही तरुण सूर्यप्रतापला घेरताना आणि त्याच्यावर हल्ला करताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तपासानुसार, असदला चाकू त्याचा मित्र फरहान याने पुरवला होता. तसेच सूर्यप्रतापच्या हत्येचा कट आधीच रचण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात असदसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असदचे वडील नवाब यांच्यावर हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. फरहान आणि अतीफ यांनाही अटक झाली आहे. तर सारिक नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपी आणि पीडित हे सर्वजण 17 ते 20 वर्षे वयोगटातील असल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी असद फरार झाल्यानंतर त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 31 मे रोजी तो पैशांची व्यवस्था करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाकेबंदी करून सापळा रचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंदिरापूरमजवळील निर्जन ठिकाणी असद पोलिसांना दिसताच त्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत असद गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्यासोबत असलेला एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. या चकमकीत एक हवालदारही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. असदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेतला नाही. अखेर त्याच्या काकांनी मृतदेह स्वीकारून मूळ गावी नेला. सध्या या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून गाझियाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
ADVERTISEMENT











