रात्रपाळी करणाऱ्या नर्सने वृद्ध डॉक्टरचा केला गेम, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 09:55 AM • 24 Jul 2026

एका रात्रपाळीवर काम करणाऱ्या नर्सने 65 वर्षीय डॉक्टरची भयंकर फसवणूक केली आहे. राजस्थानमधील ही घटना असून संबंधित नर्सला आता ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रात्रपाळी करणाऱ्या नर्सने वृद्ध डॉक्टरचा केला गेम

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका 65 वर्षीय ज्येष्ठ डॉक्टराला आपल्याच रुग्णालयात काम करणाऱ्या महिला परिचारिकेने (नर्स) प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 2016 मध्ये रुग्णालयात काम सुरू केलेल्या कमला उर्फ कमलेश नावाच्या या परिचारिकेने रात्रीच्या शिफ्टदरम्यान डॉक्टरांच्या खोलीत ये-जा वाढवून त्यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर काही खाजगी छायाचित्रे आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करून तिने डॉक्टरांना धमकावण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन तिने डॉक्टरांकडून तब्बल दोन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राजस्थानमधील बाडमेर येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

प्रतिष्ठेमुळे डॉक्टर घाबरले

आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि रुग्णालयाची पत वाचवण्यासाठी घाबरलेले डॉक्टर आरोपी महिला मागेल तितके पैसे सतत देत राहिले. यापैकी 35 लाख रुपये रुग्णालयाच्या बँक खात्यावरून ऑनलाईन वर्ग करण्यात आले होते. याशिवाय, आरोपी परिचारिकेने डॉक्टरांकडून अनेक कोऱ्या धनादेशांवर (चेक्स) आणि स्टॅम्प पेपरवरही स्वाक्षऱ्या करून घेतल्या होत्या. इतकेच नव्हे तर तिने डॉक्टरांना एक स्वतंत्र मोबाईल आणि सिम कार्ड देऊन तो नेहमी चालू ठेवण्यास भाग पाडले होते. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पासवर्ड मिळवून आणि लोकेशन ट्रॅक करून ती डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती, ज्यामुळे डॉक्टरांना एका प्रकारच्या 'डिजिटल अरेस्ट'चा सामना करावा लागत होता.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर, 16 जिल्ह्यांवर आस्मानी संकट

अखेर कमलाला अटक

अखेर या जाचाला कंटाळून पीडित डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. डॉक्टरांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाडमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) नितेश आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आरोपी महिला नर्स कमला हिला अटक केली आहे. तिच्याकडून सध्या 17 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, तिने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणातील ऑनलाईन आर्थिक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची सखोल चौकशी करत असून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा : पालघरला पावसाने झोडपलं, जनजीवन विस्कळीत; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

धमकावून कोट्यवधी उकळले

हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या या हायप्रोफाईल प्रकरणामुळे संपूर्ण राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विश्वासू कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे जाळे विणून वर्षांनुवर्षे शोषण केल्याची ही घटना व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एका नामांकित डॉक्टराला अशा प्रकारे धमकावून कोट्यवधी रुपये काढल्याच्या घटनेने नागरिकांमध्येही मोठा धक्का बसला असून, पोलीस आता या प्रकरणाशी जोडलेल्या सर्व बाजूंचा निष्पक्षपातीपणे तपास करत आहेत.