Crime News : हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्यावर जाणाऱ्या एका 37 वर्षीय महिला कॅबिन क्रू सदस्यावर तिच्या कॅब चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअरलाइन कंपनीने कर्मचारी वाहतुकीसाठी ठरवून दिलेल्या कॅबमधून ही महिला प्रवास करत होती. 20 जुलै रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास शमशाबाद येथून विमानतळाकडे जात असताना, 23 वर्षीय चालकाने गाडी निर्धारित मार्गाने न नेता विमानतळाजवळील एका निर्जन व बांधकामाधीन भागात वळवली.
ADVERTISEMENT
नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचे सांगितले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचे सांगून गाडी थांबवली आणि तो बाहेर पडला. मात्र, अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तो परत आला आणि गाडीच्या मागील दरवाजातून आत घुसून त्याने महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार केला. या प्राणघातक प्रसंगी पीडित महिलेने हिमतीने त्याला प्रतिकार केला आणि त्याला ढकलून देऊन गाडीचा दरवाजा उघडला. तिने आरडाओरड करत मदतीसाठी जवळच असलेल्या एका कामगाराच्या दिशेने धाव घेतली.
हे ही वाचा : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा!
24 तासात आरोपीला अटक
महिलेला मदतीसाठी आरडाओरड करताना पाहून आरोपी चालकाने घाबरून गाडीसह तिथून पोबारा केला. या घटनेनंतर पीडित महिलेने त्वरित राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस चौकीत पोहोचून घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत बलात्कार आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी 24 तासांच्या आत चक्रे हलवून रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एर्रापोगू प्रशांत कुमार या आरोपीला 21 जुलै रोजी अटक केली.
हे ही वाचा : 'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी
ड्रायव्हरने दिली कबुली
चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कॅब सेवा संबंधित एअरलाइन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी कंत्राट दिलेल्या एका स्थानिक ट्रान्सपोर्ट एजन्सीद्वारे चालवली जात होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी एअरलाइन कंपनीला महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित नियमावलीचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एअरलाइन कंपनी तपासात पूर्ण सहकार्य करत असून पीडित कर्मचाऱ्याला आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवत आहे.
ADVERTISEMENT












