odisha crime news : ओडिशामध्ये एका महिलेची अत्यंत धाडसी आणि तितकीच थरारक सुटका पोलिसांनी केली. भुवनेश्वरच्या बाहेरील भागातील रतनपूर रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये अडकलेल्या महिलेला ड्रोन आणि रॉकेट आतिषबाजीच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दुष्कर्माच्या प्रयत्नातून स्वतःचा बचाव करण्यासाठी जंगलात पळून गेली होती. मात्र, जंगलात प्रवेश केल्यानंतर ती रस्ता चुकली आणि बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडत नव्हता. अखेर तिने मोबाईल फोनद्वारे पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नवऱ्याचा खून, रक्ताच्या थारोळ्यात मुलगा; मन सुन्न करणारा घटनेचा थरार
घरी सोडवतो म्हणून नेत अत्याचाराचा प्रयत्न
पोलिसांच्या माहितीनुसार, महिला खुर्दा बसस्थानकातून एका मोटरसायकलस्वाराकडून लिफ्ट घेऊन प्रवास करत होती. मात्र, त्या व्यक्तीने तिला कथितपणे लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने रतनपूर रिझर्व्ह फॉरेस्टच्या दिशेने नेले. जंगलात पोहोचल्यानंतर आरोपीने तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, महिलेने त्याला जोरदार विरोध केला आणि त्याच्याशी झटापट करून तेथून पळ काढला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती जंगलाच्या आतपर्यंत धावत गेली. या गडबडीत ती जंगलात भरकटली आणि बाहेर पडण्याचा मार्ग हरवून बसली.
हेही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले
पोलिसांनी जंगलातून सुखरूप बाहेर काढले
महिलेचा मदतीचा कॉल मिळताच एसीपी (झोन-III) यांच्या नेतृत्वाखाली इन्फोव्हॅली, जटानी आणि खंडगिरी पोलीस ठाण्यांतील सुमारे 50 पोलिसांचे पथक तातडीने शोधमोहीमेसाठी रवाना झाले. मात्र, महिलेच्या मोबाईल फोनवरील जीपीएस लोकेशन बंद असल्यामुळे तिचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनची मदत घेतली. तसेच फ्लेअर गन आणि रॉकेट आतिषबाजीचा वापर करून जंगलात प्रकाश निर्माण करण्यात आला. या प्रकाशाच्या मदतीने महिलेला पोलिसांचे स्थान समजले आणि ती सुरक्षितपणे त्यांच्या दिशेने पोहोचू शकली. त्यानंतर पोलिसांनी तिला जंगलातून सुखरूप बाहेर काढले.
पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला संबंधित महिला तक्रार दाखल करण्यास तयार नव्हती. मात्र, समुपदेशनानंतर तिने तक्रार नोंदविण्यास संमती दिली. त्यानंतर इन्फोव्हॅली पोलीस ठाण्यात दुष्कर्माच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेत वापरण्यात आलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT












