Crime News : कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा शहरात एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला मूळची पश्चिम बंगालची असून ती उपजीविकेसाठी म्हैसूरमध्ये राहत होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
घरी जात असताना घडला अनर्थ
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आणि एफआयआरमधील माहितीनुसार, 18 जुलै रोजी ती तिच्या मनप्रीत नावाच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी म्हैसूर शहरात गेली होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरातून निघालेली ही महिला पार्टी संपल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मैत्रिणीला रेल्वे स्टेशनवर सोडून परत टी. नरसीपुरा येथे येण्यासाठी खाजगी बसमध्ये बसली. रात्री 9:45 च्या सुमारास ती टी. नरसीपुरा येथील खाजगी बस स्थानकावर पोहोचली. तेथून ती घराकडे पायी जात असताना एका राखाडी रंगाच्या (ग्रे) कारमधील ड्रायव्हरने तिच्याजवळ गाडी थांबवून एका कागदावरील पत्ता विचारण्याचे नाटक केले. पीडितेने आपल्याला कन्नड भाषा येत नसल्याचे सांगताच, कारच्या मागील सीटवर बसलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिला बळजबरीने ओढून कारमध्ये डांबले.
हे ही वाचा : मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण.. राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?
लॉजवर नेऊन बलात्कार
कारमधील तिघांनी तिला गप्प बसण्याची धमकी दिली आणि ओरडल्यास बिअरच्या बाटलीने डोके फोडून मारून टाकण्याची भीती दाखवली. आरोपींनी तिला टी. नरसीपुरा येथील गुंजा नरसिम्हास्वामी मंदिर मार्गे मोगुरु गावाजवळ असलेल्या एका लॉजवर नेले. रात्री 11:30 च्या सुमारास लॉजच्या मागील दाराने तिला एका खोलीत नेण्यात आले. तिथे तिघांनी तिला जबर मारहाण करत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी तिच्याकडे पैशांची मागणी केली आणि तिच्याजवळील 5,000 रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल फोन लुटले.
'अशी' झाली सुटका
आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पीडितेने चलाखी दाखवत आपल्या घरी 1 लाख रुपये ठेवले असल्याचे सांगितले आणि ते पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला घरी नेण्यास सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 1:30 ते 2 च्या दरम्यान आरोपींनी तिला तिच्या राहत्या घराच्या परिसरात आणून सोडले. सुटका झाल्यानंतर पीडितेने लगेचच आपल्या घरमालकाचे घर गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. घरमालकाच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ माहिती देण्यात आली.
हे ही वाचा : “मविआ आंदोलनात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय”
तिघांना अटक
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला टी. नरसीपुरा पोलीस ठाण्यात आणले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी म्हैसूर येथील के. आर. रुग्णालयातील 'सखी वन स्टॉप सेंटर'मध्ये दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि 24 तासांच्या आत किरण, किशोर आणि रियान या तिन्ही आरोपींना अटक केली. हे तिन्ही आरोपी टी. नरसीपुरा येथीलच रहिवासी असून त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा : आपल्या तरुणांकडे टॅलेंटची कमी नाही, 26 वर्षीय सिद्धार्थने 1 दिवसात कसे कमावले 77 कोटी?
पीडितेनं सांगितला भयानक घटनाक्रम
पीडित महिलेने एफआयआरमध्ये आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल अत्यंत दुःखद माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात तिच्या आई-वडिलांसह दोन भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या आजी-आजोबांनी तिचा सांभाळ केला, परंतु 2006 मध्ये आजोबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून तिची आजी कर्करोगाने (कॅन्सर) ग्रस्त असून तिच्या उपचारासाठी मोठा खर्च झाल्याने कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट ओढावले होते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आजी सलीना मुंडा हिच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी ही महिला तीन महिन्यांपूर्वी म्हैसूरमधील टी. नरसीपुरा येथे आली होती. तिथे तिने विवेकानंद नगरमध्ये भाड्याने खोली घेऊन एका फास्ट-फूडच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली होती. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या या महिलेवर घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी टी. नरसीपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












