Pune Crime News : पुण्यातील कात्रज परिसरात नुकत्याच घडलेल्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या एका खुनाशी संबंधित धक्कादायक घटनाक्रम उघड झाला आहे. शिंदेवाडी परिसरात 11 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास संजय बाबूराव कडू देशमुख (वय 40) यांची धारदार शस्त्राने तब्बल 28 वार करून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राजगड पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर तपास पथकांनी घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. या तपासादरम्यान सर्वप्रथम मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशीतून मिझान गजुद्दीन शेख आणि संदीप बाबूलाल खोरी यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दिल्ली: जंतर मंतरजवळ रात्री अचानक दगडफेक, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने
वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पाहिली अनेक वर्षे वाट
तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीतून या हत्येचा संबंध थेट 2003 सालातील एका खुनाशी जोडला गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, 2003 मध्ये संजय बाबूराव कडू देशमुख यांनी त्यांचा मित्र दिनेश वैद्य यांची हत्या केली होती. त्या वेळी दिनेश वैद्य यांचा मुलगा मंथन हा अवघा दीड वर्षांचा होता. त्यानंतर अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. मात्र, आरोपीला शिक्षा न झाल्याने आणि तो पुढील काळातही विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकत राहिल्याने वैद्य कुटुंबीयांमध्ये संताप कायम असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंथन वैद्यने चौकशीदरम्यान 2003 मध्ये वडिलांच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण अनेक वर्षे संधीची वाट पाहत होतो, अशी माहिती दिली.
हेही वाचा : 'पोलीस माझ्या कानात म्हणाले हे सरकार हटवा', राहुल गांधींनी सगळंच सांगितलं! राडा झाला तेव्हा काय घडलं?
कात्रज घाट परिसरात चौघांनी मिळून केली हत्या
पोलिस तपासात आणखी एक बाब समोर आली की, संजय बाबूराव कडू देशमुख यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांच्याविरुद्ध 2007, 2008, 2011 तसेच त्यानंतरच्या काळात विविध पोलिस ठाण्यांमध्ये खुनासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 2023 मधील एका खुनाच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता. पोलिसांच्या चौकशीनुसार, न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि कात्रज घाट परिसरात चौघांनी मिळून त्यांची हत्या केली. घटनास्थळावरून आणि आरोपींकडून धारदार शस्त्रे तसेच एक देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले असून पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
या प्रकरणातील इतर तिन्ही आरोपींवरही विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध पुढील तपास सुरू ठेवला असून या संपूर्ण हत्याकांडामागील नियोजन, शस्त्रांची उपलब्धता आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपीने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हे कृत्य केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या एका खुनाची छाया आजच्या हत्येपर्यंत पोहोचल्याचे समोर आले असून पोलिस तपासातून या संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला आहे.
ADVERTISEMENT












