पत्नीने दिली सुपारी, मुलीची साथ, भाचाने केली हत्या; रस्ते अपघाताचा बनाव उघडकीस

मुंबई तक

• 07:33 PM • 22 Jul 2026

crime news : मेहसाणा येथे सुरुवातीला रस्ता अपघात वाटणाऱ्या प्रकरणाने तपासादरम्यान धक्कादायक वळण घेतले. पोलिसांनी पत्नी, मुलगी आणि सख्ख्या भाच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करत तिघांना अटक केली आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीने दिली सुपारी, मुलीची साथ, भाचाने केली हत्या

point

रस्ते अपघाताचा बनाव उघडकीस

Crime News : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात घडलेल्या एका रस्ता अपघाताच्या तपासाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला हा प्रकार साधा अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मेडिकल स्टोअर चालवणारे विनोदभाई पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. या तपासात विनोदभाई यांच्या पत्नी रीटाबेन, मुलगी आणि सख्खा भाचा विमल पटेल यांनी मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : नवऱ्याचा खून, रक्ताच्या थारोळ्यात मुलगा; मन सुन्न करणारा घटनेचा थरार

विनोदभाई यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी कार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदभाई पटेल हे विजापूर येथे मेडिकल स्टोअर चालवत होते. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते अॅक्टिव्हावरून घरी जात असताना आनंदपुरा चौकाजवळ एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा रस्ता अपघात असल्याचे दिसत होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित कार केवळ घटनेच्या दिवशीच नव्हे, तर त्याआधी अनेक दिवस विनोदभाई यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा अचानक झालेला अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळावला.

हेही वाचा : बस स्टँडवरुन अपहरण, नंतर सामूहिक बलात्कार, 30 वर्षीय महिलेसोबत काय घडलं?

पतीची हत्या करण्यासाठी भाच्याला 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन

त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे तपास पुढे नेला. पोलिसांच्या दाव्यानुसार, कार चालवणारा युवक हा विनोदभाई यांच्या पत्नी रीटाबेन यांचा सख्खा भाचा विमल पटेल होता. रीटाबेन यांनी पतीची हत्या करण्यासाठी भाच्याला 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच नंबर प्लेट नसलेल्या कारने धडक देऊन हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण कटात विनोदभाई यांची मुलगीही सहभागी होती. ती वडिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांची माहिती भाच्यापर्यंत पोहोचवत होती. घटनेच्या दिवशीही अशाच प्रकारे लोकेशनची माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, या कटामागे दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत. पहिले म्हणजे विनोदभाई यांच्या नावावरील 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि दुसरे म्हणजे दीर्घकाळ सुरू असलेला कौटुंबिक वाद. मृताचे बहीण सूर्याबेन पटेल यांनीही घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले असून, घटनेच्या काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या वागण्यात अचानक बदल झाल्याचा दावा केला आहे. तपास अधिकारी डीएसपी दिनेशसिंह चौहान यांनी सांगितले की, सुरुवातीला हा रस्ता अपघात वाटत होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी पत्नी, मुलगी आणि भाचा विमल पटेल यांना अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सध्या सुरू आहे.