मेहुणा अन् भावजीचा एका तरुणीवर जीव जडला, शेवटी कुणी कोणाला संपवलं? महिन्यानंतर उलगडा

मुंबई तक

• 07:44 AM • 25 Jul 2026

Crime News : झारखंडमधील गिरिडीह येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा महिनाभरानंतर जंगलात सांगाडा सापडला. तपासात मेहुण्यानेच प्रेमसंबंध आणि कौटुंबिक तणावातून हत्या केल्याची कबुली दिली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तक्रारदार मेहुणाच निघाला खुनी

point

महिनाभरानंतर जंगलात सापडला सांगाडा, धक्कादायक कट उघड

Crime News : गिरिडीह येथील शंकर कुमार सिंह उर्फ बिंदू सिंह हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर तब्बल महिनाभराने त्याचा सांगाडा धनबाद जिल्ह्यातील टुंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसहा जंगलात आढळून आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला असून शंकरची हत्या त्याच्याच मेहुण्याने, चंदन कुमार भोक्ता याने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चंदनला अटक केली आहे. 1 जुलै रोजी शंकरचे वडील हृदय नारायण सिंह यांनी गिरिडीहमधील पीरटांड़ पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी धनबादमध्ये राहणाऱ्या प्रयागराज येथील मूळ रहिवासी सोनिया आणि इतरांवर अपहरणाचा संशय व्यक्त केला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी अपडेट, पाहा सरकारने CJP ला नेमकं सांगितलं तरी काय

चंदनसोबत प्रेमसंबंध पण शंकरचा लग्नाचा हट्ट

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी डॉ. बिमल कुमार यांच्या निर्देशानुसार एसडीपीओ आबिद खान यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक तसेच मानवी पुराव्यांच्या आधारे सोनियाची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने सुरुवातीला तिचे चंदनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. चंदननेच तिची ओळख आपल्या मेव्हण्या शंकरशी करून दिली होती, अशी माहितीही तिने दिली. त्यानंतर देवघर जिल्ह्यातील सीरसा गावातून चंदनला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण कट उघड केला.

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

गमछ्याने गळा आवळून केली हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनिया विवाहित असून तिला तीन मुले आहेत. ती पतीपासून वेगळी राहत होती. चंदन आणि सोनिया यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र शंकर सोनियाशी लग्न करण्याचा हट्ट धरून होता. त्यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता आणि त्याची मागणी मान्य झाली नाही तर काही गोष्टी उघड करण्याची धमकी देत होता. त्यामुळे चंदन संतप्त झाला होता. त्याने नियोजनपूर्वक शंकरला मोटारसायकलवरून सोनियाला भेटण्यासाठी घेऊन जाण्याचा बहाणा केला. गिरिडीहहून धनबादकडे जात असताना टुंडीतील बसहा जंगलात निर्जन ठिकाणी थांबून त्याने प्रथम दगडाने शंकरच्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतर गमछ्याने गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह जंगलात टाकून तेथून पलायन केले.

महिनाभरानंतर जंगलात सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून नारंगी रंगाचा गमछा, शर्ट, जीन्स, अंतर्वस्त्रे, चप्पलांची जोडी, मोबाईल फोन आणि चाकूसह विविध वस्तू जप्त केल्या आहेत. सांगाडा आणि जप्त केलेले साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृत्यूची वेळ, पद्धत आणि संपूर्ण घटनाक्रमाची वैज्ञानिक पडताळणी केली जाणार आहे. SIT आणि फॉरेन्सिक पथक या प्रकरणातील हत्या, घटनास्थळ, वापरलेले हत्यार आणि संभाव्य सहआरोपी यांसह सर्व बाबींचा तपास करत आहेत. चंदनविरुद्ध मारहाण, हत्या तसेच पुरावे किंवा मृतदेह लपविण्याशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. शंकरच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून स्थानिकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे, कारण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवणारा मेहुणाच या हत्येचा आरोपी निघाला. एसडीपीओ आबिद खान यांनी या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.