अकोला : उपचाराच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली, लज्जास्पद वर्तन करणाऱ्या डॉक्टरला अटक

मुंबई तक

01 Sep 2026 (अपडेटेड: 01 Sep 2026, 10:50 AM)

Akola Crime News : उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने तरुणीशी अशोभनीय वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडलाय. तक्रारीनंतर सिव्हिल लाईन पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी आरोपीला ‘शिवसेना स्टाईल’ने चोपल्याचा दावा केला आहे.

Akola Crime News

Akola Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अकोला : उपचाराच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली

point

लज्जास्पद वर्तन करणाऱ्या डॉक्टरला अटक

Akola Crime News, धनंजय साबळे : अकोल्यात उपचाराच्या बहाण्याने एका तरुणीशी अशोभनीय वर्तन आणि छेडछाड केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गेल्या सुमारे सात ते आठ महिन्यांपासून आरोपी डॉक्टरकडे उपचार घेत होती. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता ती उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. 

हे वाचलं का?

तक्रारीनुसार, तपासणी आणि चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टर तिला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घेऊन गेला. याचदरम्यान डॉक्टरने तिच्या इच्छेविरुद्ध अशोभनीय स्पर्श केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच तिला मिठी मारण्याचा आणि किस करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?

मेडिकल स्टोअरमध्येही अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप

तरुणीने आपल्या तक्रारीत मेडिकल स्टोअरमध्येही अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला आहे. औषध देण्याच्या बहाण्याने तिला मेडिकल स्टोअरमध्ये नेण्यात आले आणि तिथेही डॉक्टरने कथितरीत्या लज्जास्पद वर्तन केल्याचे तिने सांगितले. या घटनेनंतर तरुणीने संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह ती सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचली आणि डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी केस क्रमांक 609/2026 नोंदवला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : पुण्यात गणेशोत्सवात DJ वाजणार की नाही? CM यांनी स्पष्टच सांगितलं

डॉक्टरला पकडून ‘शिवसेना स्टाईल’ने चोपल्याचा दावा

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरचा शोध सुरू केला. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी 46 वर्षीय प्रविण श्यामसुंदर अग्रवाल (रा. म्हाडा कॉलनी, रामनगर, अकोला) याला अटक केली. दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुकेश मुरूमकर आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसैनिकही घटनास्थळी पोहोचले. मुरूमकर यांनी आरोपी डॉक्टरला पकडून ‘शिवसेना स्टाईल’ने चोपल्याचा दावा केला आहे. तसेच आरोपी डॉक्टरने यापूर्वीही अनेक मुला-मुलींसोबत अशाच प्रकारचे वर्तन केल्याचा आरोप मुरूमकर यांनी केला आहे. मात्र, या जुन्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

या प्रकरणात काही लोकांकडून दोन्ही पक्षांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, ही चर्चा यशस्वी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू करून आरोपी डॉक्टरला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.