Akshay Shinde Encounter Fir: दीपेश त्रिपाठी, ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल (23 सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. ज्यानंतर या प्रकरणी बरीच चर्चा सुरू झाली. विरोधकांनी याबाबत अनेक सवालही उपस्थित केले. आरोपीच्या हातात हातकड्या असतानाही त्याने गोळ्या कशा झाडल्या? यासारखे अनेक प्रश्न विचारले जात असतानाच आता या प्रकरणातील FIR समोर आला आहे.
ADVERTISEMENT
या FIR मध्ये अक्षय शिंदेवर नेमक्या कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या आणि घटना कशी घडली याबाबतची माहिती देण्यात आली आहे. वाचा एफआयआर जशीच्या तशी.
हे ही वाचा>> Badlapur Rape Case: कोण आहेत PI संजय शिंदे? ज्यांनी केला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
FIR जशीच्या तशी...
First Information contents (प्रथम खबर हकीकत):
मी संजय रामचंद्र शिंदे, (वय 57 वर्ष) मी सन 1992 पासुन महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीस असुन दि. 03/09 / 2024 पासुन मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत आहे. मी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 409/2024, भा.द.वि.स.क. 377, 324, 504, 506 या गुन्ह्याचे तपासकामी मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात काम करीत असुन सदर गुन्ह्याचा मी तपासी अधिकारी आहे.
बदलापुर पुर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 380 / 2024 या गुन्ह्यात तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा आमचेकडे तपासावर असलेल्या वर नमुद गु.र.नं. 409 / 2024 या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याने त्याचा ताबा मिळणेसाठी मा. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, 7 कल्याण यांच्याकडुन दि. 20/09/2024 रोजी ताबा वॉरन्ट घेण्यात आले होते.
हे ही वाचा>> Badlapur: 'माझा पोरगा भोळा, गरीब गाय त्याला पोलिसांनीच...', पाहा अक्षय शिंदेची आई काय-काय म्हणाली!
दि. 23/09/2024 रोजी सदर तपास पथकातील मी, सपोनि निलेश मोरे, नेम. अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे शहर, पो. हवा./3745 अभिजीत मोरे व पोहवा / 5729 हरिश तावडे असे सरकारी वाहनाने दुपारी 14:00 वा. मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद करून तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झालो होतो. मी व सपोनि निलेश मोरे यांनी सरकारी पिस्टल सोबत घेतले होते. त्यावेळी मी माझे पिस्टल मध्ये 5 राउंड लोड केलेले होते.
दि. 23/09/2024 रोजी 17:30 वा. तळोजा मध्यवर्ती कारागृह येथुन आरोपी अक्षय शिंदे यांस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेवुन आम्ही पोलीस पथक पोलीस व्हॅनने मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे निघालो होतो. मी सदर वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजुस पुढे बसलो होतो व सपोनि निलेश मोरे आणि 2 अंमलदार आरोपीसह वाहनाचे मागील बाजुस बसले होते. सदर वाहन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता सपोनि / निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा, "मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेवुन जात आहात? आता मी काय केले आहे?" असे रागाने बोलत असुन शिवीगाळ करीत असल्याचे सांगीतले.
त्यामुळे मी वाहन थांबवुन आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोहवा / हरिश तावडे यांच्या बाजुला येवुन बसलो. त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सपोनि. मोरे व पो.ह. / अभिजित मोरे यांच्या मध्ये आरोपी अक्षय शिंदे बसला होता.
आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेवुन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्या जवळ आलो असता 18:15 वाजताचे सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सपोनि/निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्टल बळाचा वापर करून खेचु लागला असता सपोनि / निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यास अडविण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी, "मला जाऊ द्या" असे म्हणत होता.
झटापटीमध्ये सपोनि / निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने सपोनि निलेश मोरे यांचे पिस्टलचा ताबा घेवुन "आता मी एकालाही जीवंत सोडणार नाही" असे रागाने ओरडुन आम्हास बोलु लागला. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे व पोहवा / हरिश तावडे याच्या दिशेने त्याचे हातातील पिस्टल रोखुन आम्हाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.
आरोपी अक्षय शिंदे याचे रौद्र रूप व देहबोली पाहुन तो त्याच्याकडील पिस्टल मधुन आमच्यावर गोळ्या झाडुन आम्हाला जीवे मारणार अशी माझी पुर्णपणे खात्री झाली म्हणुन मी प्रसंगावधान राखुन मी व माझे सहकारी यांचे स्वरक्षणार्थ माझे कडील पिस्टल ने 1 गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होवुन खाली पडला व त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला.
त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळविले व वाहन चालकाला सुचना देवून वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हास्पीटल, कळवा येथे आणुन मी, आरोपी अक्षय शिंदे व सपोनि/निलेश मोरे औषधोपचारासाठी दाखल झालो. त्यानंतर सपोनि / निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपीटर हॉस्पीटल, ठाणे येथे दाखल केले असुन वैद्यकिय उपचार चालु आहेत. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापुर्वीच मयत झाला असल्याचे मला नंतर समजले.
तरी आरोपी अक्षय शिंदे यास तळोजा कारागृह येथुन ताब्यात घेवुन मध्यवर्ती गुन्हे शाखा येथे सरकारी वाहनाने आम्ही घेवून येत असतांना दि. 23/09/2024 रोजी 180:15 वा. च्या सुमारास मुंब्रा देवी पायथ्याच्या जवळ मुंबा बायपास रोडवर आरोपी अक्षय शिंदे याने आमच्या कायदेशीर रखवालीतुन पळुन जाण्याच्या उद्देशाने सपोनि / निलेश मोरे यांच्याकडील सरकारी पिस्टल अचानक बळजबरीने खेचुन घेवुन 1 गोळी सपोनि / निलेश मोरे यांच्यावर व 2 गोळ्या माझेवर आणि पोहवा / हरिश तावडे यांच्यावर झाडुन आम्हास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे मी माझ्या व माझे सहकारी यांचे स्वसंरक्षणार्थ प्रसंगावधान राखुन अक्षय शिंदे याच्या दिशेने 1 राउंड फायर केला असता त्यामध्ये तो जखमी होवुन नंतर मयत झाला आहे. म्हणुन माझी आरोपी अक्षय शिंदे याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता 262, 132, 109, 121, सह भारतीय हत्यार कायदा कलम 27 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. माझी फिर्याद ज्युपिटर हा ँस्पीटल येथे लॅपटापवर टंकीत केलेली असून ती मला वाचून दाखविली. ती माझे सांगण्यानुसार बरोबर आहे.
ADVERTISEMENT











