रोहिदास हातागळे, अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवार, 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्वानाच चक्रावून टाकणारी ही घटना घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गावातीलच 13 वर्षीय शाळकरी मुलावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(1), 65(2) तसेच POCSO कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
प्राप्त माहितीनुसार, पीडित बालिका आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत असताना आरोपी अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने बुधवारी (1 एप्रिल) सकाळी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुरावे गोळा करण्याचे कामही जोरात आहे.
अवघ्या आठवड्यात दुसरी घटना
ही घटना येथील जनतेमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे. अवघ्या आठवड्यापूर्वीच डोंगर पिंपळा येथे 15 वर्षीय एका मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. दोन्ही घटनांमुळे अंबाजोगाई तालुका आणि संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. स्थानिक नागरिकांनी बालकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा>> 'त्या' गोळ्या अन् Inside Story, अशोक खरात अश्लील चाळे करण्याआधी महिलांना द्यायचा 'त्या' गोळ्या?
पोलिसांचे आश्वासन
बर्दापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, “दोन्ही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपी असल्याने कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी गावपातळीवर जागरूकता मोहीम राबवण्यात येईल.” पोलिसांनी पालकांना मुलांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा>> दिवसभर वीटभट्टीवर काम अन् रात्री मालकाच्या वासनेची शिकार, पोटासाठी राबणाऱ्या अल्पवयीन मुलींची पोलिसांनी कशी केली सुटका?
ही घटना केवळ एका गावाची नाही तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय बनली आहे. POCSO कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. या प्रकरणात न्याय प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











