चिटफंड योजनेमुळे कर्जात बुडाला, 26 वर्षीय तरुणाने आधी आई, बहिण अन् भाच्याचा गळा चिरला मग केली आत्महत्या

डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने एका कुटुंबाचा अंत झाला आहे. कुटुंबातील २६ वर्षीय तरुणाने आपली आई, बहिण आणि भाच्याचा गळा चाकून गळा चिरला. यानंतर त्याने स्वत:च्याही गळ्यावर चाकूने वार केले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:59 PM • 29 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

चिटफंड योजनेमुळे कर्जात बुडाला

point

26 वर्षीय तरुणाने आधी आई, बहिण अन् भाच्याचा गळा चिरला

point

मग केली आत्महत्या

Crime News : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने शेवट झाला आहे. बेंगलोर जवळील अनेकल तालुक्यातील मल्लेनाहल्ली येथे शनिवारी (28 मार्च) रात्री ही खळबळजनक घटना घडली. वाढते कर्ज आणि सावकारांचा सततचा जाच यामुळे त्रस्त होऊन एकाच कुटुंबातील चौघांनी मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आशा (55) आणि त्यांची मुलगी वर्षिता (32) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहन (26) आणि अकरा वर्षांचा चिमुरडा मयंक सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. एका सुखी कुटुंबाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

'कर्जाचा बोजा सहन करु शकत नाही'

घटनेच्या दिवशी रात्री 10 ते 10 :30 च्या दरम्यान या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. 'आम्ही सावकारांचा दबाव आणि कर्जाचा बोजा आता सहन करू शकत नाही,' असे सांगत त्यांनी हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवला. व्हिडिओ पाहताच नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली, मात्र त्याआधीच होत्याचे नव्हते झाले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता, शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून दरवाजा तोडला तेव्हा आतले दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आशा आणि वर्षिता यांचा श्वास थांबला होता, तर मोहन आणि मयंक वेदनेने विव्हळत होते.

हे ही वाचा : पत्नीचा मर्डर केल्याने वडील तुरुंगात; ज्याच्याकडे आश्रयासाठी गेली त्या मामानेच केला भाचीवर बलात्कार

आर्थिक संकट आणि आजारपण

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मोहन हा चिटफंड व्यवसायात होता आणि मागील काही काळापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. त्यातच त्याची बहीण वर्षिता दीड वर्षांपासून ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होती. या दुहेरी संकटामुळे खचलेल्या मोहनने आधी आई, बहीण आणि भाच्यावर चाकूने वार करून त्यांचे गळे चिरले आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विवंचना आणि आजारपणाने एका तरुण मुलाला इतके हतबल केले की, त्याने स्वतःच्या हाताने आपल्या कुटुंबाचा अंत करायचे ठरवले.

हे ही वाचा : 15 दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत कोर्टात लव्ह मॅरेज; पण लगेच आयुष्य का संपवलं? सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

पोलिसांकडून गुन्हा दाखल

सध्या एका खाजगी रुग्णालयात मोहन आणि मयंकवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सावकारांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळेच हा आत्महत्येचा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा कर्जाचा बाजार आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण हा गंभीर विषय समोर आणला आहे.