Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या प्रेमसंबंधातून असा काही प्लॅन आखला की, यात तिचे कुटुंब आणि पोलीस तब्बल 15 दिवस गुंतून राहिले. या मुलीने घरातच एका कोंबड्याचा गळा कापून तिचे रक्त संपूर्ण अंगणात पसरवले आणि त्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत पसार झाली. सुरुवातीला हा प्रकार एखाद्या मोठ्या गंभीर गुन्ह्याचा किंवा अनर्थाचा वाटत होता, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा सगळेच जण चक्रावून गेले.
ADVERTISEMENT
अंगणात रक्ताचे डाग
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली होती की, त्यांची अल्पवयीन मुलगी 30 एप्रिलच्या रात्री अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी जेव्हा घरात सगळीकडे रक्त सांडलेले पाहिले, तेव्हा त्यांना मुलीसोबत काहीतरी अघटीत घडल्याची दाट शंका आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. घराच्या अंगणासह अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळल्याने, पोलिसांनी अपहरण किंवा हत्येची शक्यता गृहीत धरून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
हे ही वाचा : शिवानीची बॉडी गुपचूप रानात पुरली, पण एकाने पाहिलंच, शेवटी प्रकरण उघडकीस!
भिवंडीतून अटक
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस सातत्याने त्या मुलीचा शोध घेत होते. शेवटी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, ती मुलगी कोणाच्या दबावाशिवाय स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली असून, ती सध्या तिचा प्रियकर मयंक कुमार याच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात राहत आहे. यानंतर रोहतास पोलिसांच्या पथकाने तातडीने महाराष्ट्रात येऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी तरुण मयंक कुमार याला अटक केली असून ट्रान्झिट रिमांडवर त्याला बिहारमध्ये आणले आहे.
हे ही वाचा : डॉक्टरने विद्यार्थीनीला इंजेक्शन दिलं, कुटुंबिय बाहेर बसलेले असताना.., भयंकर प्रकार!
पाच वर्षांपासून प्रेमसंबंध
पोलीस चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. ही मुलगी आणि मयंक यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, कुटुंबाकडून या नात्याला होणाऱ्या विरोधाच्या भीतीपोटी दोघांनी मिळून घरातून पळून जाण्याचा प्लॅन आखला होता. या योजनेचा एक भाग म्हणून, मुलीने घरात कोंबडी कापून तिचे रक्त सगळीकडे पसरवले होते, जेणेकरून तिच्या कुटुंबाला आणि पोलिसांना तिच्यासोबत काहीतरी अघटीत घडले आहे असे वाटावे आणि त्यांच्यावर संशय येऊ नये. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला असून, सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT











