Crime News : छत्तीसगडमधील दुर्ग येथे महाराष्ट्रातील कल्याण येथील 26 वर्षीय अंजली घोडेस्वर या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजली 8 सप्टेंबर 2026 रोजी दिल्लीत जाऊन पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे सांगून घरातून निघाली होती. घरच्यांचा विश्वास बसावा म्हणून ती दिल्लीतील कोचिंग क्लासेसचे आणि वर्गातील अभ्यासाचे फोटो कुटुंबाला पाठवत होती. मात्र, प्रत्यक्षात ती दिल्लीत नसून दुर्ग येथील शंकर नगरमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय करण सिंह या CISF जवानासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही अवघ्या 15 दिवसांपूर्वीच या भाड्याच्या घरात राहण्यास आले होते. करण आणि अंजलीची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, पण या दोघांच्या एकत्र राहण्याबद्दल अंजलीच्या कुटुंबाला काहीही माहिती नव्हती.
ADVERTISEMENT
मृत्यू झाल्याची माहिती कशी कळाली?
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अंजलीच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने ती घरातील जबाबदाऱ्या पार पाडत होती आणि तिचे सरकारी नोकरीचे स्वप्न हे कुटुंबासाठी मोठा आधार होते. घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, अंजली आणि करण यांच्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहारही झाले होते; अंजलीने वेगवेगळ्या तारखांना करणच्या खात्यावर सुमारे 25 ते 30 हजार रुपये पाठवल्याचे स्क्रीनशॉट्स नातेवाईकांकडे उपलब्ध आहेत. या मृत्यूची माहिती कुटुंबाला पोलिसांकडून न मिळता थेट करणने फोन करून दिली. करणने आपण दोघे लवकरच लग्न करणार होतो असे सांगत अंजलीने गळफास घेतल्याचा दावा केला. घटनेनंतर त्यानेच तिला खाली उतरवून मृतदेहाची माहिती दिल्याचे म्हटले आहे, तर दुर्गचे CSP हर्षित मेहर यांनी प्राथमिक शॉर्ट पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे डॉक्टरांनी आत्महत्येचा उल्लेख केल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : बारामती दुहेरी हत्याकांडात 7 दिवसांनी सर्वात मोठा खुलासा, आरोपी सापडला
हत्या की आत्महत्या?
अंजलीच्या कुटुंबीयांनी मात्र तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या फोटोंमध्ये अंजलीच्या शरीराची अवस्था, कपड्यांची स्थिती, तिच्या एका कानातील बाळी गायब असणे आणि संशयित करणच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या दुखापती यावरून ही घटना सामान्य आत्महत्या वाटत नसल्याचे तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. अंजलीची लहान बहीणने आरोप केला आहे की, ही आत्महत्या नसून करणनेच तिची हत्या केली असावी. याप्रकरणी तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवून न्यायाची मागणी कुटुंबाकडून केली जात आहे. मोहन नगर पोलीस ठाण्यात सध्या मर्ग दाखल करण्यात आला असून, कुटुंबीयांनी पोलिसांवर दिरंगाईचा आरोप केला असला तरी पोलीस सर्व बाजूंची कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांसाठी वाहतुकीची मोठी सोय! बस, टॅक्सी, रिक्षासह अनेक पर्याय
पोलिसांनी काय सांगितले?
सध्या दुर्ग पोलीस घटनास्थळ, फॉरेन्सिक पुरावे, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी करत आहेत. प्राथमिक तपासात आणि वैद्यकीय अहवालात आत्महत्येचा संशय व्यक्त केला गेला असला तरी, कुटुंबाने लावलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत. पोस्टमार्टम पूर्ण झाल्यानंतर अंजलीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास झाल्यानंतर आणि अंतिम फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंजलीच्या मृत्यूमागचे खरे कारण आणि सर्व तथ्ये अधिक स्पष्ट होतील असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












