Nagpur Crime : नागपूरमधून नात्याला काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या 44 वर्षीय सावत्र वडिलांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीच्या शरीरावर संदिग्ध दुखापतींच्या खुणा आढळल्याने तिच्या आईला संशय आला, पण नेमकं काय घडत आहे हे समजण्यासाठी तिनं घरात टीव्हीच्या मागे अत्यंत चलाखीने एक सीसीटीव्ही कॅमेरा लपवून बसवला. या कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज स्वतःच्या मोबाईलवर न बघता तिने एका मैत्रिणीच्या मोबाईलवर पाहण्याची खास सोय केली होती.
ADVERTISEMENT
सीसीटीव्हीमुळे नराधम बापाचे रुप उघडकीस
या गुप्त सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमुळे सौतेल्या बापाचे नराधम रूप आणि सुरू असलेले अमानुष अत्याचार स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले. आरोपी नराधमाने यापूर्वी मुलीला वारंवार शारीरिक अत्याचार करून कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे भीतीपोटी ती मुलगी बऱ्याच काळापासून गप्प राहिली होती.
हे ही वाचा : सतेज पाटलांची संपत्ती किती? चंद्रकांत पाटलांच्या आरोपांनंतर प्रॉपर्टीची चर्चा
आरोपीला अटक
मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण सत्य उघड झाल्यानंतर सतर्क आईने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित 44 वर्षीय नराधम सावत्र बापाला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायदा (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा : परिचारकांच्या एन्ट्रीने सोलापूर बँकेच्या निवडणुकीत गेम पलटणार!
पोलीस काय म्हणाले?
प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे सध्या पोलिसांकडून याविषयी अधिकृत बाइट किंवा माहिती देण्याचे टाळले जात असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नागपूर शहरात घडलेल्या या हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT












