चल पार्टी देतो म्हणून मित्राला नेलं, पण दारुच्या पैशांवरुन वाद अन् थेट केला मर्डर

सुमित भुजबळ

• 01:54 PM • 11 Nov 2026

Crime News : मेरठमध्ये दारूच्या पार्टीत पैशांवरून झालेल्या वादातून विशाल कुमारने मित्र सनी उर्फ लालाची चाकूने वार करून हत्या केली. आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

चल पार्टी देतो म्हणून मित्राला नेलं

point

पण दारुच्या पैशांवरुन वाद अन् थेट केला मर्डर

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान पैशांवरून झालेल्या वादातून एका 20 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने चाकूने वार करून हत्या केली. सनी उर्फ लाला असं मृत तरुणाचं नाव असून विशाल कुमार असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात येऊन मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत

मिळालेल्या माहितीनुसार, सनी उर्फ लाला हा मेरठमधील फजलपूर परिसरात राहत होता. तो रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत करत होता. सोमवारी संध्याकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास तो विशाल कुमारसोबत घरातून बाहेर पडला होता. विशालने पार्टी देण्याच्या बहाण्याने सनीला सोबत नेलं होतं. दोघेही एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते. मात्र, दारूचे पैसे कोणी द्यायचे, यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. यावेळी विशालने सनीवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात सनीचा मृत्यू झाला. दरम्यान, सनी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं.

हेही वाचा : 'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर

दारूच्या पैशांवरून झालेला वाद हे हत्येमागचं प्राथमिक कारण

या घटनेनंतर बुधवारी सकाळी विशाल कुमार आपल्या कुटुंबीयांसह टीपी नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना आपण मित्राची हत्या केल्याची माहिती दिली. विशालने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या घराची तपासणी केली. यावेळी पोलिसांना सनीचा मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून विशालला अटक केली आहे. या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची चौकशी सुरू आहे. मेरठ शहराचे पोलीस अधीक्षक विनायक गोपाल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या पैशांवरून झालेला वाद हे हत्येमागचं प्राथमिक कारण असल्याचं तपासात समोर आलं आहे. मात्र, या प्रकरणातील इतर संभाव्य कारणांचाही पोलीस तपास करत आहेत.

सनीच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं आहे. त्याच्या कुटुंबात आई रेखा आणि तीन भाऊ मोंटू, सचिन आणि रिंकू आहेत. कुटुंबातील सदस्य रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करतात. दुसरीकडे, आरोपी विशाल कुमार हा मूळचा बहसूमा परिसरातील राजपुरा गावचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून तो संबंधित परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. पत्नी आणि मुलांसोबत कौटुंबिक वाद सुरू असल्याने तो त्यांच्यापासून वेगळा राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या हत्येप्रकरणी पुढील तपास करत आहेत.