Crime News : एका 4 ते 5 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या निर्घृण हत्येची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लवकर व जास्त पैसे कमावण्याच्या नादात आरोपीने या चिमुकल्याचे शरीर कापून किडनी, फुप्फुसे आणि डोळे बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून रिमांडवर पाठवले आहे. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
गळा चिरुन हत्या अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकला जितेंद्र राम याचे वडील रामजीत राम हे कुटुंबासह मजुरी करण्यासाठी जशपूर जिल्ह्यातील सन्ना येथे आले होते. मृत चिमुकल्याचा मामे भाऊ लागत असलेला आरोपी वासुदेव याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. 5 नोव्हेंबर रोजी आरोपीने रामजीत आणि एका परिचिताला दारू पाजली आणि त्यानंतर संधी साधून चिमुकल्या जितेंद्रला फसवून आपल्यासोबत नेले. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल्यानंतर त्याने रात्री झोपडीत पुन्हा दारू पिऊन चाकूने गळा चिरून चिमुकल्याची हत्या केली.
हे ही वाचा : '... अश्रू तरळले!', पवारांविषयी सोनिया गांधींनी पुस्तकात काय लिहिलंय?
किडनी, फुप्फुसे आणि डोळे काढले
हत्या केल्यानंतर आरोपीची क्रूरता थांबली नाही. त्याने चिमुकल्याच्या पोटातून किडनी, फुप्फुसे आणि डोळे काढून प्लास्टिकच्या बाल्टीत ठेवले. त्यानंतर मृतदेह गोधडीत गुंडाळून गोणीत भरला आणि शेतातील खड्ड्यात पुरला. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी 7 नोव्हेंबर रोजी दाखल केल्यानंतर शोध मोहीम राबवली असता, शेतातील खड्ड्यात मृतदेह आढळल्याने या धक्कादायक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
हे ही वाचा : बीड : मुलीच्या अंगावर पडली फटाक्याची ठिणगी, पाच जणांवर धारदार शस्त्राने वार
आरोपीला अटक
घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी संशयित वासुदेवाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह, हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू व फावडे, प्लास्टिकच्या बादलीत लपवून ठेवलेले शरीराचे अवयव तसेच मोबाईल फोन जप्त केला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली असून पोलीस पुढील कायदेशीर करत आहेत.
ADVERTISEMENT












