सतेज पाटलांची संपत्ती किती? चंद्रकांत पाटलांच्या आरोपांनंतर प्रॉपर्टीची चर्चा

सदानंद घायाळ

12 Nov 2026 (अपडेटेड: 12 Nov 2026, 11:08 AM)

Satej Patil property net worth : सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची 2021 च्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण संपत्ती 97 कोटी 70 लाख रुपये होती. त्यांच्या मालमत्ता, बँकांमधील ठेवी, जमिनी आणि 16 कोटींहून अधिक कर्जाचा सविस्तर आढावा.

Satej Patil property net worth

Satej Patil property net worth

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विरोधकांना घाम फोडणाऱ्या सतेज पाटलांची संपत्ती किती?

Satej Patil property net worth : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सतेज पाटील यांच्या कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या विधानानंतर सतेज पाटील यांच्या संपत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, सतेज पाटील यांनी 2021 मध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 97 कोटी 70 लाख 99 हजार रुपये इतकी होती. यामध्ये सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांच्या नावावर सर्वाधिक संपत्तीची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबाकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता, बँकांमधील ठेवी, गुंतवणूक आणि विविध मालमत्ता आहेत. मात्र, या संपत्तीबरोबरच कुटुंबाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्जही असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : Weather Update: मुंबईकरांनो, पुढील 48 तास महत्त्वाचे! नेमका हवामान खात्याचा अंदाज तरी काय?

प्रतिज्ञापत्रानुसार सतेज पाटलांची संपत्ती किती? 

2021 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, सतेज पाटील यांच्या नावावर 32 कोटी 75 लाख 49 हजार रुपयांची संपत्ती होती. त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांच्या नावावर 63 कोटी 31 लाख 25 हजार रुपये, तर कन्या देवश्री पाटील यांच्या नावावर एक कोटी 64 लाख 25 हजार रुपयांची संपत्ती नोंदवण्यात आली होती. सतेज पाटील यांच्या नावावर 16 कोटी 28 लाख 1 हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती. प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यांच्याकडे केवळ 1 लाख 25 हजार 600 रुपये रोख होते. पत्नी प्रतिमा पाटील यांच्याकडे 99 हजार रुपये, तर मुलगी देवश्री यांच्याकडे 2 हजार रुपयांची रोकड होती. वाहनांच्या बाबतीत सतेज पाटील यांच्या नावावर 2019 मध्ये खरेदी केलेली 27 लाख 7 हजार रुपये किमतीची टाटा सफारी होती. त्यांच्या नावावर 396 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असून त्यांचे मूल्य 14 लाख 83 हजार रुपये होते. पत्नी प्रतिमा पाटील यांच्याकडे 230 ग्रॅम वजनाचे 8 लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने होते. याशिवाय एलआयसी आणि खासगी विमा पॉलिसींमध्ये सुमारे 2 कोटी 45 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक होती. विविध कंपन्या, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांमधील शेअर्स व रोख्यांमध्येही एक कोटी 70 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक असल्याची नोंद होती.

हेही वाचा : Personal Finance: पाण्याला येणार सोन्याचा भाव? 'या' व्यवसायांमध्ये दडली आहे मोठी संधी!

कुटुंबीयांचे बँकिंग क्षेत्रातील व्यवहारही मोठ्या प्रमाणात

सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बँकिंग क्षेत्रातील व्यवहारही मोठ्या प्रमाणात आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांची 47 सहकारी, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका तसेच वित्तीय संस्थांमध्ये खाती आणि ठेवी होत्या. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक आणि डॉयचे बँकेचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजारामबापू सहकारी बँक, वारणा सहकारी बँक आणि डॉ. डी. वाय. पाटील सहकारी बँकेतही त्यांच्या खात्यांची नोंद होती. स्थावर मालमत्तेचा विचार करता, सतेज पाटील यांच्या नावावर 16 कोटी 47 लाख 37 हजार रुपयांची मालमत्ता होती. यामध्ये 12 कोटी 31 लाख रुपयांची स्वसंपादित, तर 4 कोटी 15 लाख रुपयांची वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता होती. पत्नी प्रतिमा पाटील यांच्या नावावर 41 कोटी 47 लाख 91 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा, तळसंदे, साखरे, सैतवडे, कोदे खुर्द, पोहाळे आणि अंबप या भागांत शेतजमीन आणि बिगरशेती जमीन असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली होती.

संपत्तीबरोबरच सतेज पाटील यांच्या कर्जाचीही प्रतिज्ञापत्रात माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर एकूण 16 कोटी 53 लाख 82 हजार 513 रुपयांचे वैयक्तिक कर्ज होते. त्यांच्या पत्नीच्या नावावर 76 हजार रुपयांचे क्रेडिट कार्डचे देणे होते. प्रतिज्ञापत्रानुसार, शेती आणि नोकरीतील पगार ही त्यांच्या उत्पन्नाची साधने असल्याचे नमूद करण्यात आले होते. 2020-21 च्या आयकर विवरणपत्रानुसार सतेज पाटील यांचे वार्षिक उत्पन्न 3 कोटी 9 लाख 16 हजार 210 रुपये, तर पत्नी प्रतिमा पाटील यांचे वार्षिक उत्पन्न एक कोटी 16 लाख 6 हजार रुपये होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी 23 कोटी 53 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 2021 मध्ये त्यांच्या नावावरील संपत्ती 39 कोटी 88 लाख रुपयांवर पोहोचली होती. या सात वर्षांच्या काळात त्यांच्या संपत्तीत सुमारे 16 कोटी 32 लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, हे सर्व आकडे 2021 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आहेत. त्यामुळे सध्या त्यांची आणि कुटुंबीयांची नेमकी संपत्ती किती आहे, हे नव्या प्रतिज्ञापत्रातूनच स्पष्ट होऊ शकेल.