पुणे : कट मारल्याचा राग, कोयत्याने वार, तरुणाला पडले सातशे टाके

सुमित भुजबळ

• 05:08 PM • 11 Nov 2026

rajgurunagar koyta attack : राजगुरुनगरमध्ये जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी शिवम करमारे याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याची तीन बोटे तुटली असून एक हात निकामी झाला आहे. त्याच्या शरीरावर 700 टाके घालावे लागले.

rajgurunagar koyta attack

rajgurunagar koyta attack

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे : कट मारल्याचा राग, कोयत्याने वार

point

तरुणाला पडले सातशे टाके

Rajgurunagar koyta attack, रायचंद शिंदे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी शिवम करमारे या तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, त्याची तीन बोटे तुटली असून एक हात निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या शरीरावर तब्बल 700 टाके घालावे लागल्याचं सांगण्यात येत आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. क्षुल्लक वादातून थेट जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत मजल जात असल्याने अल्पवयीन मुलांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात 

राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेडमधील राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रोडवर ही घटना घडली. शिवम बाळासाहेब करमारे या तरुणावर तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आले. जुन्या भांडणाच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताची तीन बोटे तुटली आहेत. तसेच एक हात निकामी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्या शरीरावर सुमारे 700 टाके घालावे लागल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : 'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर

या घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी अल्पवयीन मुलांमधील हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली. मोबाईलवरील गेम आणि चित्रपट पाहून काही तरुणांमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती वाढताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासोबतच शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वास्तविक जीवन आणि आभासी जग यातील फरक मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. मोबाईल गेम किंवा चित्रपटांमधील गोष्टींचा प्रभाव त्यांच्या वर्तनावर पडू नये, यासाठी त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असल्याचं गिरीगोसावी यांनी सांगितलं. अशा प्रवृत्तींपासून अल्पवयीन मुलांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, राजगुरुनगरमधील या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या हातात धारदार शस्त्रे कशी पोहोचतात आणि किरकोळ वादातून इतक्या टोकाची हिंसा कशी घडते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. गाडीला कट मारण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद किंवा जुन्या भांडणातून निर्माण झालेला राग थेट कोयत्याने हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पालक, शैक्षणिक संस्था आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.