Vasai Crime News ,वसई : लोकल ट्रेनमधून प्रवास करताना छेडछाडीचा जाब विचारल्याने एका 20 वर्षीय तरुणीला चालत्या लोकलखाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. आरोपीने दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे तरुणी थेट रेल्वे रुळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिला फलाटावर चढता आले नाही. या दुर्घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून कापला गेला असून ती गंभीर जखमी झाली आहे. सोफिया खान (20) असे जखमी तरुणीचे नाव आहे. ती नायगाव पूर्व परिसरात राहते. सोफिया गृहिणी असून 4 नोव्हेंबर 2026 रोजी ती गोरेगाव येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेली होती. बहिणीची भेट घेतल्यानंतर ती लोकलने घरी परतत होती.
ADVERTISEMENT
दोघांनी एकमेकांना चप्पल फेकून मारली, अन् आरोपीने रुळावर ढकलून दिलं
सायंकाळी सुमारे 7 वाजून 15 मिनिटांनी सोफिया बोरीवली ते नायगाव असा रेल्वेने प्रवास करत होती. यावेळी लोकलमधील एका अज्ञात प्रवाशाने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सोफिया संतप्त झाली. नायगाव रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरल्यानंतर तिने संबंधित प्रवाशाला त्याच्या कृत्याचा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर सोफियाने संतापाच्या भरात संबंधित प्रवाशाला चप्पल फेकून मारली. त्यावर आरोपीनेही तिला चप्पल मारली. त्यानंतर त्याने सोफियाला जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे ती रेल्वेच्या दोन डब्यांमधील मोकळ्या जागेतून थेट रुळांवर पडली.
हेही वाचा : "चंद्रकांतदादांचा हा नालायकपणा, भीक मागून तुमचं नेतृत्व घडलं", रवींद्र धंगेकरांचा संताप
डावा हात आल्याने कोपरापासून कापला गेला
सोफिया रुळांवर पडली, त्याचवेळी लोकल सुरू झाली. त्यामुळे तिला पुन्हा फलाटावर चढण्याची संधी मिळाली नाही. लोकलच्या चाकाखाली तिचा डावा हात आल्याने तो कोपरापासून कापला गेला. या घटनेत सोफिया गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छेडछाडीला विरोध करून जाब विचारल्यानंतर झालेल्या या हल्ल्यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या घटनेत तरुणीला आपला डावा हात गमवावा लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दिलेल्या धक्क्यामुळेच सोफिया रेल्वे रुळांवर पडली आणि लोकलच्या चाकाखाली आल्याने तिचा हात कापला गेला.
या प्रकरणी भाईंदर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने विशेष पथके नियुक्त केली होती. आरोपीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास करण्यात आला. या तपासाच्या आधारे पोलिसांनी अखेर 9 नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी माहिती दिली आहे. छेडछाडीचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत 20 वर्षीय सोफियाला आपला डावा हात गमवावा लागला असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT












