Chhatrapati Sambhaji Nagar Crime : गेल्या काही दिवसात मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्ते खराब असल्याने मुलं टू व्हिलर घेऊन बाहेर जाऊ नयेत, असा विचार करुन मोठ्या भावाने टू व्हिलरमधील पेट्रोल बाटलीत काढून ठेवलं. मात्र, काही वेळातच या पेट्रोलमुळे घरात भडका उडालाय. या आगीत एकाच कुटुंबातील 4 जण भाजले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी (दि.26) घडली आहे.
ADVERTISEMENT
पेट्रोलचा भडका उडताच मुलांना घराबाहेर फेकलं
अधिकची माहिती अशी की, पेट्रोलचा भडका उडाल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जण गंभीररित्या भाजले आहेत. प्रकाश दळवे (वय 40), राधा दळवे (40), आकाश दळवे (15), गोपाल दळवे (12) अशी भाजलेल्या व्यक्तींची नाव आहेत. राधा दळवे आणि गोपाल दळवे हे 60 टक्के भाजले आहेत. चौघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पेट्रोलच्या बाटलीला कुठेतरी छिद्र असल्यामुळे हा भडका उडाल्याचं नातेवाईक अर्जुन दळवे यांनी सांगितलंय. या घटनेची नोंद पाचोड पोलिसांकडून घेण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, पेट्रोलमुळे भडका उडाल्यानंतर प्रकाश दळवे यांनी आकाश आणि गोपाल यांना घराबाहेर फेटकले होते. त्यानंतर या दोन्ही मुलांनी घराजवळील हौदा उडी मारली, असंही नातेवाईकांनी स्पष्ट केलंय.
बाटलीतून पेट्रोल नेताना काळजी घेणे महत्त्वाचे
दरम्यान, या घटनेमुळे घरात बाटलीतून पेट्रोल नेणे किती धोकादायक आहे? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पेट्रोल किरकोळ ठिणगी आणि सिगारेटच्या धुरामुळे देखील पेट घेऊ शकतं आणि मोठी आग लागू शकते. त्यामुळे बाटलीतून पेट्रोल हाताळत असताना नागरिकांनी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. घरात लहान मुलं असतील तर ते पेट्रोलच्या बाटलीला स्पर्श करु शकतात. गळती झाल्यास लहान मुलांना गंभीर इजा होऊ शकते.
ADVERTISEMENT
