Crime News : हरियाणा राज्यातील पंचकुला शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीच्या अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंचकुला परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील मृत चिमुकल्याचा पहिला वाढदिवस अवघ्या तीन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण असतानाच हा निष्पाप जीव अशा अमानुष कृत्याचा बळी ठरेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. मात्र प्रेमातून जन्माला आलेल्या विकृत मानसिकतेमुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाल हा पंचकुला शहरातील सेक्टर 12-ए येथील एका क्रॅचमध्ये गेला होता. त्याने स्वतःची ओळख चिमुकल्याचा वडील ‘रवी’ अशी खोटी सांगून क्रॅच (मुलांना सांभाळण्यासाठी असलेली जागा) चालकाकडून बाळाला ताब्यात घेतले. ओळखपत्र किंवा कोणतीही खातरजमा न करता क्रॅच चालकाने बाळ आरोपीच्या स्वाधीन केल्याने गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. यानंतर आरोपी गोपालने नियोजनबद्ध पद्धतीने बाळाचे अपहरण करून त्याची हत्या केली. बाळाचा मृतदेह पिंजौरजवळील सुखोमाजरी बायपास परिसरात एका गोणीत भरून फेकण्यात आला होता. शनिवारी रात्री पोलिसांनी हा मृतदेह जप्त केला. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
तपासादरम्यान पोलिसांना क्रॅच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यामध्ये सुमारे 35 वर्षांचा एक युवक चिमुकल्याला कडेवर घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पंचकुला पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत सीमावर्ती भाग सील केले आणि इतर जिल्हे तसेच राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला. चौकशीत आरोपीची ओळख पिंजौर येथील गोपाल अशी पटली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, तो वारंवार आपले जबाब बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. आरोपीचे पीडित बालकाच्या आईसोबत इंस्टाग्रामवरून ओळख निर्माण झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर गोपालने चिमुकल्याला आपल्या प्रेमसंबंधातील अडसर मानायला सुरुवात केली आणि त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पोलिस बालकाच्या आईचीही कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात तिचा कोणताही सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच क्रॅच चालकाच्या निष्काळजीपणावरही पोलिस कारवाई करण्याची शक्यता आहे. या हृदयद्रावक घटनेने समाजातील नैतिकता, बालसुरक्षा आणि क्रॅच व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निष्पाप जीवाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











