Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला पैमा परिसरातील बंद घरातून मंगळवारी सकाळी उजमा हिचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात फरार असलेल्या तिचा पती फरहान याला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं
मोबाईल फोन पाहू देत नसल्याने वाद अन् थेट हत्या
चौकशीदरम्यान फरहानने हत्येमागील कारणांबाबत अनेक दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नी त्याला तिचा मोबाईल फोन पाहू देत नव्हती आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले ब्लेडही जप्त केले आहे.
हेही वाचा : आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा
तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाशीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरो खिडकी परिसरात राहणाऱ्या उजमा हिचा याच वर्षी 20 एप्रिल रोजी आग्र्यातील ताजगंज येथील रहिवासी फरहान याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांतच तिची हत्या करण्यात आली. घटनेनंतर फरहानने घराला कुलूप लावून तेथून पलायन केले होते. मंगळवारी सकाळी बंद घरातून उजमाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या चौकशीत फरहानने असा दावा केला की, उजमा त्याला तिचा मोबाईल फोन हाताळू देत नव्हती. अनेकदा मोबाईल पाहण्याचा प्रयत्न केल्यावर दोघांमध्ये वाद होत असल्याचे त्याने सांगितले. तसेच निकाहाच्या वेळी दोघांनी एकमेकांच्या मुलांची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले होते, मात्र नंतर उजमा या निर्णयापासून मागे हटल्याचा आरोपही त्याने केला. त्याच्या म्हणण्यानुसार, उजमा तिच्या मुलांना माहेरी ठेवून आली होती. नंतर तो मुलांना स्वतःसोबत घेऊन आला असता ती त्यांच्यासाठी जेवण बनवत नव्हती. त्यामुळे घरात सतत वाद होत असल्याचा दावा आरोपीने केला आहे.
फरहानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशीही उजमाने जेवण बनवले नव्हते. त्यामुळे तो रागाच्या भरात घराबाहेर पडत असताना उजमाने त्याला ओढल्याने तो जिन्यावरून पडला, असा त्याचा दावा आहे. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने कथितरित्या दगडाने तिच्या डोक्यावर वार केला आणि नंतर ब्लेडने तिचा गळा चिरला. हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावून तो कॅन्ट रेल्वे स्थानकावर गेला आणि समोर आलेल्या रेल्वेत बसून फरार झाला. एसीपी ताज सुरक्षा यतेंद्र सिंह नागर यांनी सांगितले की, बंद घरात महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून फरहानविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर फरहानला अटक करण्यात आली असून चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT












