Lucknow bca student murder case : लखनौमध्ये बुधवारी एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले. बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीची तिच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. घटना घडली तेव्हा विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत आढळून आला, तर तिचा क्लासमेट गंभीर जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी पडलेला होता. विद्यार्थिनीची मोठी बहीण कॉलेजमधून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शिवसेना नाव आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात ठाकरेंची बाजू मांडताना सिब्बलांचा तुफान युक्तिवाद
दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याने वर्गमित्र भडकला
ही घटना पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरपतखेडा परिसरात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी तरुण चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या घरी आल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अन्य एका तरुणाशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती तपासात पुढे आली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, दोघांमध्ये शाब्दिक वादानंतर झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने चाकूने विद्यार्थिनीचा गळा चिरला. पोलिसांनी या हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला असून त्याचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं, नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट
दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का? तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला प्रथम लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली जात असून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का, याचाही तपास सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाइल चॅट आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
या घटनेबाबत परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, दुपारच्या सुमारास घरातून भांडण आणि आरडाओरड ऐकू आली होती. मात्र तो कौटुंबिक वाद असावा, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर घरात विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे समोर आले. घटना घडली तेव्हा विद्यार्थिनीचे आई-वडील अमेठी येथे गेले होते. माहिती मिळताच ते तातडीने लखनऊला परतले. डीसीपी कमलेश दीक्षित यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात विद्यार्थिनीच्या क्लासमेटची भूमिका समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












