Crime News : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून एक अतिशय सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या एका सैनिकानेच आपल्या राहत्या घरी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. बंद खोलीत सुरू झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर काही मिनिटांतच रक्तरंजित हत्याकांडात झाले. ही खळबळजनक घटना गुरुवारी (6 ऑगस्ट) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास खजुरी रोड परिसरात घडली. सुट्टीवर घरी आलेला लष्करी जवान सोहन सिंग सिकरवार आणि त्याची 30 वर्षांची पत्नी राणी सिकरवार यांच्यात कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची झाली होती.
ADVERTISEMENT
चकवा देऊन पसार
पाहता पाहता हा वाद इतका वाढला की, सोहन सिंगने स्वतःवरील ताबा गमावला आणि पिस्तुल काढून पत्नीच्या डोक्यात थेट गोळी झाडली. गोळी लागताच राणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपी जवान गंभीर अवस्थेत असलेल्या पत्नीला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचला. मात्र, डॉक्टरांनी महिला मृत झाल्याचे सांगताच तो चकवा देऊन तिथून पसार झाला. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा : सुनावणीत सुप्रीम कोर्टात जे झालं ते सरोदेंनी अगदी सोप्या भाषेत समजावलं
आई-वडिलांवरही गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वेगाने सूत्रे हलवून आरोपी सैनिक सोहन सिंग सिकरवार याला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल परवानाधारक होते की बेकायदेशीर, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय, मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचे वडील नरोत्तम सिकरवार आणि आई मुन्नी देवी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : शिवसेनेच्या वकिलांचा सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर विश्वास आहे का?
कौटुंबिक कलह
तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कलह हेच या गुन्ह्याचे मुख्य कारण मानले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. संपूर्ण तपास पूर्ण करून सर्व तथ्ये न्यायालयात मांडली जातील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
ADVERTISEMENT












