Palghar Crime : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एका ९ वर्षांच्या आदिवासी बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील 45 वर्षीय आरोपी प्रमुल उर्फ प्रफुल्ल उर्फ प्रमोद रत्ना घोसे याला पालघरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. डहाणूच्या पूर्व भागातील एका आदिवासी पाड्यात 27 सप्टेंबर 2021 रोजी ही थरारक आणि संतापजनक घटना घडली होती. पॉक्सो आणि हत्येच्या या गंभीर प्रकरणात पालघर जिल्ह्यात सुनावण्यात आलेली ही पहिलीच मरेपर्यंत फाशीची शिक्षा असल्याचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT
अश्लील चित्रे दाखवून बलात्कार
घटनेच्या दिवशी अवघ्या 9 वर्षे 8 महिने वयाच्या चिमुकलीला तिच्या आईने किराणा सामान आणण्यासाठी दुकानात पाठवले होते. रस्त्यात शेजारीच राहणाऱ्या आरोपीने तिला फसवून आपल्या घरी नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्लील चित्रे दाखवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने मुलीला खाऊसाठी 10 रुपये दिले, परंतु वेदनेने व्याकुळ झालेल्या बालिकेने घडलेला प्रकार वडिलांना सांगणार असल्याचे सांगून तिथून पळ काढला. आपले कृत्य उघडकीस येण्याच्या भीतीपोटी आरोपीने घरातून धारदार कोयता आणून बालिकेचा पाठलाग केला आणि तिच्या डोक्यावर, मानेवर व चेहऱ्यावर सुमारे 15 वार करून तिची अत्यंत निघृणपणे हत्या केली.
हे ही वाचा : 2023 च्या सुप्रीम कोर्ट निकालात काय होतं, ज्याचा दाखला ठाकरे अजूनही सुप्रीम कोर्टात देतात?
अडवणाऱ्या व्यक्तीवरही हल्ला
या हत्याकांडादरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या एका 40 वर्षीय प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला का मारत आहे, असा जाब विचारला. त्यावर संतापलेल्या आरोपीने त्या व्यक्तीवरही कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याच्या मानेवर दोन वार केले आणि त्याला गंभीर जखमी केले. पुराव्याचा नायनाट करणे आणि साक्षीदाराला संपवण्याच्या या प्रयत्नाची न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन डहाणूचे साहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला होता.
हे ही वाचा : भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा? दिपके हसले, काय बोलून गेले?
दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण
न्यायालयात विशेष सरकारी वकील ॲड. रेखा इवराले यांनी प्रभावीपणे बाजू मांडून आरोपीच्या कठोर शिक्षेची मागणी केली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी हे प्रकरण 'दुर्मिळातील दुर्मिळ' मानत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा अंतिम निकाल सुनावला जात असताना आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप किंवा भाव दिसून आले नाहीत. या कठोर निर्णयामुळे पीडित कुटुंबाला शेवटी न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT












