Crime News : कर्नाटकातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने आपल्या गर्भवती मुलीचा तिच्याच सासरी जाऊन निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्या सासूला गंभीर दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी वडिलांनी तलवारीसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून हा हल्ला केला. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
ही धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील इनापूर गावात घडली. मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांनी सुमारे सात महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम करून घरच्यांच्या विरोधात जाऊन विवाह केला होता. विवेकानंद हे दलित समाजातील असल्याने मान्याच्या कुटुंबाने या नात्याला तीव्र विरोध दर्शवला होता. या वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत तडजोडीचे प्रयत्नही केले होते.
नोंदणीकृत विवाहानंतर मान्या आणि विवेकानंद हावेरी जिल्ह्यात वास्तव्यास होते. गावाकडे परतण्याची त्यांना सतत भीती वाटत होती. मात्र 8 डिसेंबर रोजी ते दोघे इनापूर गावात परतले. त्यावेळी मान्या सहा महिन्यांची गर्भवती होती. मान्याच्या गावात येण्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी सूडबुद्धीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा : 'या' राशींवर होणार प्रेमाचा वर्षाव, तर काही राशीतील लोकांना नोकरीत मिळणार प्रमोशन
रविवारी संध्याकाळी, कट रचून विवेकानंदांचे वडील सुभाष दोड्डामणी यांना ट्रॅक्टरने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विवेकानंदांना फोन करून वडिलांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देण्यात आली. ही बातमी ऐकताच विवेकानंद तातडीने घराबाहेर पडले. त्याच वेळी घरात मान्या आणि तिची सासू रेणता दोड्डामणी या दोघीच उपस्थित होत्या.
याच संधीचा फायदा घेत मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील, नातेवाईक वीरंगौडा पाटील आणि भाऊ अरुण गौडा यांनी घरात घुसून प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवला. तलवारीने केलेल्या या हल्ल्यात मान्याला गंभीर जखमा झाल्या. प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर तिची सासू गंभीर जखमी झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर संपूर्ण इनापूर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रेमविवाह, जातीय द्वेष आणि ऑनर किलिंगच्या संशयातून घडलेल्या या घटनेमुळे कर्नाटकसह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले, पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले
ADVERTISEMENT











