Crime News : गुजरातमधील चर्चित स्वीटी पटेल हत्याकांडात करजन कोर्टाने मृतक स्वीटी पटेलचा पती आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय देसाई यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करण्याचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली सहआरोपी किरीटसिंह जडेजे यांनाही न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि प्रकरणातील पुरावे विचारात घेतल्यानंतर हा गंभीर प्रकार असल्याचे नमूद केले. पोलीस अधिकारी असूनही अजय देसाईंनी बंद घरात आपल्या पत्नीची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..
37 वर्षीय स्वीटी पटेल ही आनंद जिल्ह्यातील उमरेठ तालुक्यातील पंसोरा गावची रहिवासी होती. तिने त्याच गावातील हेतस पांड्या याच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहातून त्यांना दोन मुले झाली. मात्र 2014 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2015 मध्ये स्वीटीची PSI अजय देसाई यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 2016 मध्ये त्यांनी रूपाल येथील एका मंदिरात गंधर्व विवाह केला. 2019 मध्ये या विवाहातून स्वीटीला एका मुलाचा जन्म झाला. दरम्यान, अजय देसाईंनी 2017 मध्ये आपल्या समाजातील दुसऱ्या तरुणीशी कायदेशीर विवाह केला होता. यामुळे स्वीटी आणि अजय यांच्यात अनेकदा वाद होत होते. अजयने आपल्यासोबतच्या विवाहाची सार्वजनिकरित्या कबुली द्यावी, अशी स्वीटीची इच्छा होती. याच कारणावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाच्या प्रगतीला गती देणार 'शक्तीची सप्तधारा'
अजय देसाईंनी स्वीटीचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप
4 जून 2021 रोजी मध्यरात्री करजन येथील प्रयोशा सोसायटीमध्ये अजय देसाई आणि स्वीटी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादानंतर अजय देसाईंनी स्वीटीचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वीटीचा मृतदेह चादरीत गुंडाळून जीपमध्ये ठेवला आणि भरूचकडे नेला. भरूच जिल्ह्यातील दहेजजवळील अटाली परिसरात त्यांनी मृतदेह जाळल्याचे तपासात समोर आले. 5 जून 2021 रोजी स्वीटी पटेल बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि सुरुवातीला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र अहमदाबाद क्राइम ब्रांच आणि ATSच्या तपासादरम्यान 49 दिवसांनी या हत्याकांडाचा उलगडा झाला.
तपासादरम्यान स्वीटीच्या घरात रक्ताचे डाग आढळले. तसेच मृतदेह जाळण्यात आल्याच्या ठिकाणाहून हाडांचे अवशेष, दात आणि दागिने जप्त करण्यात आले. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर डिजिटल पुराव्यांमुळे तपासाला बळ मिळाले. या तपासात काँग्रेस नेते किरीटसिंह जडेजे यांचे नावही समोर आले. त्यांच्यावर हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास आणि पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप होता. त्यानंतर अहमदाबाद क्राइम ब्रांचने करजन कोर्टात 1290 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात 100 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक पुरावे, डिजिटल डेटा आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात आली. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अजय देसाईंना जन्मठेपेची, तर सहआरोपी किरीटसिंह जडेजेंना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT












