Baramati Crime News : बारामतीतील इंद्रप्रस्थ सोसायटीत पतीला घराच्या बाल्कनीतच पुरण्याचा झालेला प्रयत्न गवंड्याच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. प्रवीण जगताप हे पत्नी शर्मिला आणि आईसोबत राहत होते. या दाम्पत्याला दोन मुले असून, दोन्ही मुले काही महिन्यांपासून शर्मिलाच्या माहेरी राहत आहेत. शर्मिलाला झाडे लावण्याची आवड होती. घराच्या बाल्कनीत झाडे लावण्याची इच्छा तिने पतीकडे व्यक्त केली होती आणि प्रवीणनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर बाल्कनीत झाड लावण्यासाठी एक जागा तयार करण्यात आली. मात्र, याच जागेचा वापर प्रवीणला संपवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
प्रवीण आणि त्याच्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या अन्...
शर्मिलाने केलेल्या जेवणातून प्रवीण आणि त्याच्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्याचे नंतर समोर आले. जेवण केल्यानंतर दोघेही गुंगीत गेले आणि बेशुद्ध झाले. त्यानंतर शर्मिलाने प्रवीणला बॅट आणि काठीने मारहाण केल्याचे प्रवीणने पोलिसांना सांगितले आहे. मारहाणीदरम्यान प्रवीण ओरडत होता, मात्र गुंगीमुळे त्याला स्वतःचा बचाव करता येत नव्हता. काही वेळाने त्याचा आवाज बंद झाल्याने शर्मिलाला त्याचा मृत्यू झाल्याचे वाटले. त्यानंतर तिने प्रवीणला बाल्कनीत झाड लावण्यासाठी तयार केलेल्या जागेत टाकले. त्यावर चादरी आणि उशा ठेवण्यात आल्या. ही जागा मोठ्या लादीने बंद करून त्यावर प्लास्टर करण्याचा तिचा प्लॅन असल्याचे समोर आले.
हेही वाचा : Maharashtra Weather: Depression सरकलं, पण पाऊस थांबणार नाही! पुढचे 48 तास कुठे मुसळधार पाऊस?
गवंड्यामुळे शर्मिलाचा प्लान फसला
यानंतर शर्मिलाने राज नावाच्या गवंड्याला बोलावून ती लादी फिक्स करण्यास सांगितले. राज कामाला सुरुवात करत असताना शर्मिला त्याला लादी हलवू नकोस, फक्त प्लास्टर कर, असे वारंवार सांगत होती. मात्र, काम व्यवस्थित करण्यासाठी राजने लादी हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला चादरी आणि उशा दिसल्या. त्याने त्या काढण्याबाबत विचारले असता शर्मिलाने त्याला रोखले. पुन्हा लादी आणि इतर वस्तू हलवत असताना राजला आत काहीतरी हलत असल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता चौथऱ्याच्या आतून एक हात वर येताना दिसला. चादरी आणि उशा बाजूला केल्यानंतर त्याला आत एक माणूस दिसला. घाबरलेल्या राजने तिथून बाहेर पडून पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन केला.
दरम्यान, प्रवीणची आई शुद्धीवर आली आणि तिने आरडाओरडा सुरू केला. तिला जेवणातून गुंगीचे औषध दिल्याचे आणि प्रवीणला मारहाणीचे आवाज ऐकू आल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी प्रवीणच्या भावाला बोलावून घेतले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौथरा तपासला असता चादरी आणि उशांच्या खाली प्रवीण बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारानंतर काही तासांतच त्याला घरी सोडण्यात आले. प्रवीणच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर शर्मिलाला ताब्यात घेण्यात आले. शर्मिलाने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले. मात्र, प्रवीणने पोलिसांना दिलेल्या माहितीत पत्नी शर्मिला आपल्याला मारत असल्याचे सांगितले असून, तिच्यासोबत आणखी कोणीतरी असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. घरातून कुऱ्हाड आणि इतर हत्यारेही मिळाली आहेत. कॅलेंडरवरील काही तारखांवर केलेल्या खुणा पोलिसांनी जप्त केल्या असून, त्यामागे प्लॅनिंग किंवा अंधश्रद्धेचा भाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. झोपेच्या गोळ्या शर्मिलाला कुठून मिळाल्या, तिच्या मानसिक आजाराबाबत उपचार सुरू होते का आणि प्रवीण-शर्मिलाच्या नात्यातील बिघाडाचे नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












