Crime News : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी तलाव परिसरात एका कौटुंबिक वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतलंय. पाच वर्षांनंतर दिल्लीतून घरी परतलेल्या पतीने पत्नीवर अॅसिड फेकल्याची भीषण घटना घडली. या हल्ल्यानंतर पतीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडण्यात आला असता, त्या खोलीत पतीचा मृतदेह आढळून आला. त्यानेही अॅसिड प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
या घटनेत मृत पतीचे नाव दुलाल पोद्दार (वय 45) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुलाल पोद्दार गेल्या सुमारे पाच वर्षांपासून दिल्लीत मजुरीचे काम करत होता. 1 जानेवारी रोजी तो अचानक भागलपूरमध्ये घरी परतला. त्यानंतर त्याने पत्नी पूनम देवी यांना आता दिल्लीला न जाता याच ठिकाणी राहण्याचा आग्रह धरला. पूनम देवी या राणी तलाव परिसरात खासगी निवासी शाळा चालवत होत्या आणि त्या स्वतः त्या शाळेच्या प्राचार्य होत्या.
पतीच्या अचानक परतण्यामुळे आणि त्याच्या हट्टामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पती-पत्नीमध्ये आधीपासूनच जमीन आणि कौटुंबिक कारणांवरून मतभेद सुरू होते. वादाच्या भरात संतापलेल्या दुलाल पोद्दारने पत्नी पूनम देवी यांच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात पूनम देवी गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
हेही वाचा : पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद... आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल!
महिलेच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या मुलगा आयुष आनंद यानेही प्रत्यक्ष पाहिला. आयुषने सांगितले की, 1 जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वडील आईला जबरदस्तीने अॅसीड पाजण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीदरम्यान आईच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अॅसीड सांडलं. त्यानंतर तो आईला तातडीने भागलपूरच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात घेऊन गेला. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पटना एम्समध्ये हलवले. या गोंधळात वडिलांनी कधी अॅसिड प्राशन केले, हे कोणालाही लक्षात आले नाही.
घटनेनंतर दुलाल पोद्दारने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. बराच वेळ कोणतीही हालचाल न दिसल्याने कुटुंबीय आणि स्थानिकांना अनिष्टाची शंका आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीचा दरवाजा उघडला असता, आत दुलाल पोद्दारचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्यातील एका बाटलीत अॅसिड तर दुसऱ्या बाटलीत बाथरूम साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे आम्ल असल्याचा अंदाज आहे. एफएसएल पथकानेही घटनास्थळी तपास केला.
दरम्यान, पूनम देवी यांच्यावर सध्या पटना एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, या हल्ल्यात त्यांची एका डोळ्याची दृष्टी गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या पतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे राणी तलाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नीवर झालेल्या या अमानुष असिड हल्ल्याने पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











