Crime News : ग्वाल्हेरमधील बिजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. राहुल जाटव या युवकाने आपल्या पत्नीच्या कृत्यांमुळे हैराण होऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. राहुलने केलेल्या तक्रारीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी त्याचे शिवपुरी येथील राखी जाटव हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीच्या संशयास्पद हालचालींमुळे राहुलच्या मनात शंका निर्माण झाली. पत्नी राखी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी लग्नाच्या नावाखाली सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत, अशी तक्रार त्याने याआधीही स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..', संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला
पत्नीला शस्त्रास्त्रांची प्रचंड आवड
राहुलच्या तक्रारीनुसार, 15 मे रोजी सासरी आलेली त्याची पत्नी राखी 23 मे रोजी कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. त्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाईकांनी राहुलला फोन करून 5 लाख रुपयांची मागणी केली आहे. जर ही रक्कम दिली नाही, तर त्याला खोट्या कायदेशीर प्रकरणात अडकवण्याची आणि कुटुंबाला समाजात बदनाम करण्याची धमकी दिली जात आहे. पत्नीला शस्त्रास्त्रांची प्रचंड आवड असून, तिने सोशल मीडियावर बंदुकांसोबत काढलेले अनेक फोटो राहुलने पुराव्यासाठी पोलिसांना दिले आहेत. इतकेच नव्हे, तर आपल्याला अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही राहुलने केला आहे.
हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...
लग्नाच्या नावाखाली निष्पाप लोकांना लुटणारी टोळी
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, राहुलने केलेल्या चौकशीनुसार त्याची पत्नी राखी हिने यापूर्वीही अनेक लग्ने केली असल्याचा संशय आहे. ती आणि तिचे कुटुंबीय लग्नाच्या नावाखाली निष्पाप लोकांना लुटणाऱ्या टोळीचे भाग असू शकतात, असा राहुलचा आरोप आहे. या छळाच्या मागे शिवपुरी सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचाही हात असल्याचा गंभीर आरोप राहुलने केला आहे. हा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून राहुलची वैयक्तिक माहिती राखीला पुरवत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. राहुलने आता या संपूर्ण रॅकेटच्या बँक खात्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
राहुलच्या या सनसनाटी तक्रारीची दखल घेत ग्वाल्हेर पोलिसांनी प्रकरणाचा तपास बिजौली पोलीस ठाण्याकडे सोपवला आहे. पती-पत्नीमधील हे वाद केवळ वैयक्तिक नसून त्यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय असावी, असा संशय राहुलने व्यक्त केला आहे. पोलीस आता या प्रकरणातील सर्व पुरावे आणि राहुलने दिलेल्या बँक खात्यांच्या तपशीलांची पडताळणी करत आहेत. लग्नाचे सोंग घेऊन फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे उघड होतात का, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. या घटनेने ग्वाल्हेरमध्ये खळबळ उडाली असून, पीडित पतीने सुरक्षेची मागणी केल्याने पोलीस प्रशासन या प्रकरणाच्या तपासात कसून काम करत आहे.
ADVERTISEMENT











