फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर

एका फॉर्च्युनर वाहनाला आग लावण्यात आली. या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भाजप नेत्याचा समावेश आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:13 AM • 19 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : वाळू उत्खननावरून प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या वादाने मंगळवारी (16 जून) रात्री अचानक हिंसक रूप धारण केले. या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दोन्ही बाजूंच्या वादाचे पर्यावसान इतक्या भीषण मारामारीत झाले की, एका फॉर्च्युनर वाहनाला आग लावण्यात आली. या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भाजप नेते भरत सिंह उर्फ लल्ला सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचा समावेश आहे. या घटनेत सुमारे 80 टक्के भाजलेले तिसरे नागेंद्र सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या थरारानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

फॉर्च्युनर अडवली अन् जिवंत जाळलं

मिळालेल्या माहितीनुसार, नौगई गावामध्ये वाळू उपशावरून दोन गटांत जुना वाद सुरू होता. यातील एक गट भाजप नेते भरत सिंह उर्फ लल्ला सिंह यांच्याशी संबंधित होता, तर दुसरा गट मनोज त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. यापूर्वीही दोन्ही गटांमध्ये अनेकदा वाद आणि पोलीस तक्रारी झाल्या होत्या. मंगळवारी रात्री हा वाद विकोपाला गेल्यानंतर मनोज त्रिपाठी यांच्या गटातील लोकांनी रस्ता अडवून भरत सिंह यांच्या फॉर्च्युनर गाडीला वेढा घातला, असा आरोप आहे. या गाडीत भरत सिंह, त्यांचे बंधू (शिक्षक) नागेंद्र सिंह, वीरेंद्र सिंह यांच्यासह इतर काही जण होते. आरोपींनी आधी फॉर्च्युनर गाडीला ट्रकने धडक दिली आणि त्यानंतर तिला आग लावून दिली. गाडीची दारे लॉक झाल्यामुळे आत अडकलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात भरत सिंह यांचा जागीच मृत्यू झाला, तर वीरेंद्र सिंह आणि नागेंद्र सिंह यांनी उपचारादरम्यान दम तोडला. जखमींना उपचारासाठी आधी अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने रायपूरला हलवण्यात आले.

हे ही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..

नऊ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. आयजी दीपक झा यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी या चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या अमानुष घटनेवरून आता राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक आमदार भैयालाल राजवाडे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत कोरिया जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच काळी घटना असल्याचे म्हटले आहे, तर माजी आमदार गुलाब कमरो यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्याच्या वेशीवर पाऊस धिंगाणा घालणार पण... IMD चा अलर्ट

वाळू उत्खननावरुन वाद

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेशा चौबे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार वाळू उत्खननाच्या वादातून मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात हिंसक हाणामारी झाली. फॉर्च्युनर कारला आग नेमकी कशी लागली, याचा सखोल तपास केला जात आहे. सध्या पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण हत्याकांडामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच बेकायदेशीर वाळू उपशाच्या गंभीर मुद्द्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.