दोन पत्नी असल्याचे लपवण्यासाठी गरोदर प्रेयसीची हत्या, बॉडी दुसऱ्या राज्यात नेऊन पुरली

मुंबई तक

16 Aug 2026 (अपडेटेड: 16 Aug 2026, 01:41 PM)

Crime News odisha : ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातून 29 जुलैला बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय अल्बिना गराडा हिचा मृतदेह आंध्र प्रदेशातील गजपतिनगरम परिसरात जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, घरगुती वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.

Crime News odisha

Crime News odisha

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन पत्नी असल्याचे लपवण्यासाठी गरोदर प्रेयसीची हत्या

point

बॉडी दुसऱ्या राज्यात नेऊन पुरली

Crime News odisha : ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील सेमिलीगुडा येथून 29 जुलैला बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय महिलेचा मृतदेह शेजारील आंध्र प्रदेशातील गजपतिनगरम परिसरातून सापडला आहे. अल्बिना गराडा असे मृत महिलेचे नाव असून, ती कोरापुट जिल्ह्यातील दसमंतपूर परिसरातील टुंखाल गावची रहिवासी होती. तिची हत्या करून मृतदेह आंध्र प्रदेशात नेऊन जमिनीत पुरण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांची नावे सुनाबेडा येथील काकीगावचा 35 वर्षीय मोहन खिल्ला आणि सेमिलीगुडा येथील गुरुद्वार परिसरातील 19 वर्षीय मिलन कुलदीप अशी आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : आईला 'तो' मेसेज आला, घरमालकाने दार उघडताच भयंकर दृश्य दिसलं, इंजिनिअर दाम्पत्यासोबत काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्बिना 29 जुलैला सेमिलीगुडा येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 1 ऑगस्टला मोहन खिल्लाने सेमिलीगुडा पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. तपास पुढे जात असताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यातून अल्बिनासोबत काहीतरी गंभीर गुन्हेगारी घटना घडल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मोहन आणि मिलन यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान अल्बिनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेमिलीगुडा पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीने विजयनगरम जिल्ह्यातील गजपतिनगरम परिसरात शोधमोहीम राबवली.

हेही वाचा : बॉलिवूडच्या 3 अभिनेत्यांना अन्न FDA ची कारणे दाखवा नोटीस, 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

मारुपल्ली गावाजवळ एका झाडाखाली जमिनीत पुरलेला अल्बिनाचा अंशतः कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेहावर आढळलेल्या कपड्यांची ओळख अल्बिनाच्या वडिलांनी केली. कार्यकारी दंडाधिकारी, कुटुंबीय आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, डीएनए तपासणीसाठी जैविक नमुनेही सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी एक कार जप्त केली असून, याच वाहनाचा वापर मृतदेह नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. जमीन खोदण्यासाठी वापरलेली हत्यारे, आरोपींचे मोबाइल फोन, कपडे आणि इतर वैज्ञानिक पुरावेही पोलिसांनी जप्त करून तपासासाठी पाठवले आहेत.

पोलिसांच्या तपासात मोहन खिल्लाला दोन पत्नी असून, त्याचे अल्बिनासोबतही संबंध असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार, घरगुती वादातून अल्बिनाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर मिलनच्या मदतीने मृतदेह आंध्र प्रदेशात नेऊन जमिनीत पुरल्याचा आरोप दोघांवर आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, घटनेशी संबंधित इतर तथ्यांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे.