Crime News : आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुट्टी वाढवण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राची झोपेत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. निवासी शाळेच्या वसतिगृहात 4 सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. गणेश चतुर्थीच्या आधी अधिक दिवसांची सुट्टी मिळावी, या विचारातून दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्राला झोपेत गुदमरवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली असून, दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी जागे झाले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या वसतिगृहातील एका खोलीत सुमारे 15 विद्यार्थी झोपले होते. त्यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोबत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला गुदमरवण्याचा प्रयत्न केला. त्याचा गळा दाबण्यात आल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने झटापट करत आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी जागे झाले आणि त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर वसतिगृहाचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले आणि संबंधित विद्यार्थ्याची सुटका केली. पीडित विद्यार्थ्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी आपला गळा दाबल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्या दोघांना रात्रीसाठी इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना घरी पाठवले.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?
दोन वर्षांपूर्वी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मिळालेली शाळेला सुट्टी
कंबमवारिपल्ले मंडल शिक्षण अधिकारी पी. रेड्डी बाशा यांनी या घटनेची चौकशी केली. त्यांनी बुधवारी या प्रकरणातील माहिती जाहीर केली. त्यांच्या चौकशीनुसार, दोन्ही विद्यार्थ्यांना असे वाटत होते की, गणेश चतुर्थीच्या आधी संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास शाळेला अधिक दिवसांची सुट्टी जाहीर केली जाईल. दोन वर्षांपूर्वी शाळेतील एका विद्यार्थ्याचा आरोग्याच्या समस्येमुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. याच घटनेचा विचार करून दोन्ही विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी शाळेने दोन्ही विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) दिले. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी कंबमवारिपल्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षक व्ही. शिवकुमार यांनी सांगितले की, शाळा आणि वसतिगृहातील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून तपास सुरूच राहणार आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांना घरी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पुढील कारवाईसाठी पोलीस कायदेशीर मत घेत आहेत. या घटनेनंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थी घाबरले असून, घटनेच्या ठिकाणी असलेल्या त्याच खोलीत झोपण्यास अनेक विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यामुळे चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसेसच्या पथकाने शाळेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि जनजागृती सत्र घेतले.
ADVERTISEMENT












