वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील पुढील हवामानाची स्थिती काय असेल, पावसाचा जोर वाढणार का आणि शेतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार?
कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 11, 12 आणि 13 सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रातील आर्द्रता शोषली जात असून, त्याचे ढग तयार होऊन ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकत आहेत. याशिवाय मान्सून ट्रफ आणि गुजरात ते उत्तर प्रदेशदरम्यान सक्रिय असलेल्या चक्रीय अभिसरण प्रणालीमुळे अरबी समुद्रातूनही मोठ्या प्रमाणावर आर्द्रता खेचली जात आहे. या अनुकूल हवामान प्रणालींमुळे आगामी 72 तासांत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
11 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 10 सप्टेंबर रोजी नांदेड आणि नाशिकच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे, तर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी बरसतील. 11 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असून गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि नाशिकच्या घाट क्षेत्राला 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. या दिवशी धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी व लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
येलो अलर्ट जारी
12 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव सर्वाधिक पाहायला मिळणार असून, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यात विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच उत्तर व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, बीड आणि कोकणातील रायगड व ठाणे या भागांचा समावेश आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली आणि नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' विद्यानंद बापटांची चावडीवर चौफेर फटकेबाजी
आगामी तीन दिवसांत काय होणार?
सध्या मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पिके सुकू लागली असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कृत्रिम पावसाची मागणीही केली जात आहे. एल-निओच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले असले तरी, बंगालच्या उपसागरातील ही नवी हवामान प्रणाली शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आगामी तीन दिवसांतील ढगांची दिशा आणि कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता यावर राज्यातील पावसाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
