Crime News UP : उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रविवारी रात्री एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी ‘ऑनर किलिंग’ची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून संतापलेल्या कुटुंबीयांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अमानुषपणे मारहाण केल्याने दोघांचाही मृत्यू झाला. एका रात्रीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना एटा जिल्ह्यातील गढिया सुहागपूर गावात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख 25 वर्षीय दीपक (वडील – राधेश्याम) तर मृत तरुणीची ओळख 20 वर्षीय शिवानी (वडील – अशोक) अशी आहे. दोघेही एकाच गावातील आणि एकाच समाजातील रहिवासी होते. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास दीपक आपल्या प्रेयसी शिवानीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी घरातील छतावर दोघे एकत्र असल्याचं शिवानीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. कथितरित्या, दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्याने कुटुंबीयांच्या रागाचा पारा चढला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी लाठी-काठ्यांनी दीपक आणि शिवानीवर हल्ला चढवला.
मारहाण इतकी भीषण होती की शिवानीने घटनास्थळीच प्राण सोडले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दीपकला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. एकाच रात्रीत दोन तरुणांचे जीव गेल्याने गावात शोककळा पसरली असून भीतीचं वातावरण आहे.
हेही वाचा : महामुलाखत: 'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात, अत्यंत गंभीर आरोप
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) श्याम नारायण सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मोठ्या पोलीस बंदोबस्तासह फॉरेन्सिक पथकाला बोलावून पुरावे गोळा करण्यात आले. एसएसपींनी एटा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मृतदेहांची पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी शिवानीच्या कुटुंबातील काही सदस्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अद्याप कोणत्याही बाजूने औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नसली, तरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार ‘ऑनर किलिंग’चा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक पोलीस निरीक्षक रितेश ठाकूर यांच्या माहितीनुसार, गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंधांवरून आजही समाजात किती टोकाची मानसिकता अस्तित्वात आहे, याचं भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











