महामुलाखत: 'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात, अत्यंत गंभीर आरोप
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपने शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. पाहा मुंबई Tak च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज (11 जानेवारी) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना UBT आणि मनसे यांची संयुक्त सभा पार पडणार आहे. पण त्याआधी शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई Tak ला Super Exclusive मुलाखत दिली. याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अत्यंत घणाघाती अशी टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
'बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपने शिवसेनेसोबत घात करायला सुरुवात केली.' असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या महामुलाखतीत केला आहे. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना सवाल केले. ज्यावर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंी.
'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा घात करायला केली सुरुवात', पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले
'मुंबई महाराष्ट्राने मिळवली. पण त्यानंतर मराठी माणसाचंच खच्चीकरण सुरू झालं. त्या खच्चीकरणाच्या विरुद्ध आवाज उठवला तो शिवसेनाप्रमुखांनी. तिथपासून आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. भाजपने सुद्धा मधल्या काळात हिंदुत्वाचा मुखवटा घालून, तो आजही घातला आहे... शिवसेनेचा उपयोग करून घेतला. बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून भाजपने आपली पाळंमुळं रोवली. पण बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली.'
'हे मी एवढ्यासाठी सांगतोय की, 2012 साली शिवसेनाप्रमुख आपल्यातून गेले.. 2014 ला मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांनी शिवसेना सोबत घेतली आणि 2014 ला विधानसभेत भाजपने शिवसेनेशी युती तोडली होती. तिथून सुरुवात झाली प्रत्यक्ष कारवाईला. 2019 ला पुन्हा तीच फसगत झाली. आता तर कहरच झाला.'
हे ही वाचा>> महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आजही मोठा ब्रँड? मुंबईतील लोकांना काय वाटतं? C Voter च्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?
'आता शिवसेनेशी युती तर तोडली. 2019 ला मी तोडली कारण त्यांनी घात केला. तो केल्यानंतर आता शिवसेना.. बघा राजकारण कसं असतं हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण राजकारणात माणसं इकडची तिकडे जातात.. हे ठीकए.. म्हणजे राजकारण म्हणून त्याकडे कानाडोळा करू. पण पक्ष संपवणं.. पक्ष, निशाणी, बाळासाहेबांचा फोटो चोरण्याचा प्रयत्न करणं आणि ती शक्ती खतम करण्याचा प्रयत्न करणं हे कशासाठी?'










