Crime News : एक 17 वर्षीय मुलाला कपड्याच्या दुकानात जीन्स बदलायला जाणं महागात पडलं आहे. आदल्या दिवशी खरेदी केलेली जीन्स बदलण्यासाठी तो दुकानात गेला होता. त्यावेळी स्कूटीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी अल्पवयीन मुलावर सपासप वार केले आणि ते तिथून पसार झाले. ही भयानक घटना दिल्लीतील असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?', तिघांनी मिळून केला एकाचा खून
जीन्स बदलण्यासाठी आले अन्...
रेहान (17) हा आपल्या गौरव नावाच्या मित्रासोबत खरेदी केलेली जीन्स बदलण्यासाठी विशाल नावाच्या दुकानदाराकडे आला होता. दुपारी दोनच्या सुमारास हे दोघे दुकानापाशी पोहोचले आणि जीन्स बदलण्याबाबत बोलू लागले. त्याच वेळी स्कूटीवरून चार तरुण तिथे आले आणि त्यांनी काहीही न बोलता रेहान आणि गौरववर चाकूने हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात रेहानच्या छातीवर आणि शरीराच्या खालच्या भागावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तर गौरवच्या पायावर जखम झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तातडीने रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रेहानला तातडीने जवळच्या रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्याचा मित्र गौरव याच्या पायाला दुखापत झाली असून तो धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोरांचे वय 18 ते 20 च्या दरम्यान असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, रेहान आणि हल्लेखोर एकमेकांच्या ओळखीचे असावेत आणि त्यांच्यात जुन्या वादातून काहीतरी कुरबुर सुरू असावी. हल्लेखोर रेहानचा पाठलाग करतच मार्केटमध्ये आले होते असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून दुकानदाराचीही चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT











