Girl jumps from hotel : आज व्हँलेंटाईन्स डे. प्रेमी युगुलांसाठी खास असलेला, आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेण्याचा दिवस. मात्र हा दिवस साजरा होण्याच्या काही तास आधीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रेयसीने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, प्रेयसीने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?', तिघांनी मिळून केला एकाचा खून
लग्नावरून झाला वाद
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आंतरधर्मीय प्रेमसंबंधांशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा राहणारा तरुण आणि ईशान्य दिल्लीतील तरुणी यांनी दिल्लीतील 'संतोष रेसिडेन्सी' हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. खोलीत गेल्यावर तरुणीने लग्नासाठी तगादा लावला, मात्र तरुणाने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये तीव्र वादावादी झाली. याच वैफल्यातून तरुणीने अचानक बाल्कनीतून खाली झोकून दिले.
दुकानदाराच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण
तरुणी खाली पडत असताना हॉटेलच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिक दुकानातील एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने तिचे प्राण वाचले. दुकानदाराने सांगितले की, 'वरुन आवाज आल्यावर मी पाहिले की तरुणी खाली पडत आहे, क्षणाचाही विचार न करता मी दुकानातील बॉक्सचे पुठ्ठे रस्त्यावर पसरवले.' पुठ्ठ्यांमुळे तरुणी जमिनीवर न पडता त्या बॉक्सवर पडली, ज्यामुळे तिचा जीव वाचला.
पोलीस कारवाई सुरु
घटनेनंतर संबंधित तरुणानेच जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT











