'कुणाला सांगितलं तर परीक्षेत नापास करीन..' विद्यार्थ्यांना भीती दाखवून मुख्याध्यापक करायचा लैंगिक शोषण, 'असं' बाहेर आलं प्रकरण

एका मुख्याध्यापकाने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मुलाने धीर एकवटून शाळेत झालेला प्रकार पालकांना सांगितला. यानंतर अनेक विद्यार्थी पुढे आले आणि या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:19 PM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कुणाला सांगितलं तर परीक्षेत नापास करीन..

point

विद्यार्थ्यांना भीती दाखवून मुख्याध्यापक करायचा लैंगिक शोषण

point

'असं' बाहेर आलं प्रकरण

Crime News : ज्या शिक्षकाला समाजात देवाचा दर्जा दिला जातो, त्यानेच जर निष्पाप मुलांच्या विश्वासाला तडा दिला, तर ते माणुसकीवरील मोठे प्रश्नचिन्ह आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील एका शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मुख्याध्यापक संतोष नामा याने शाळकरी मुलांचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आणि प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यानंतर, या नराधम मुख्याध्यापकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

'..तर परीक्षेत नापास करेन'

शाळा ही मुलांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्याची जागा असते, मात्र संतोष नामा याने तिथे दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते. हा मुख्याध्यापक मुलांना गव्हाचे दळण आणणे किंवा इतर घरगुती कामांच्या बहाण्याने निर्जन स्थळी घेऊन जात असे. तिथे तो मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण करत असे. आपली ही कृत्ये उघड होऊ नयेत म्हणून तो आपल्या पदाचा गैरवापर करत असे. 'जर कुणाला सांगितले तर परीक्षेत नापास करेन,' अशी धमकी तो मुलांना देत असे. याच भीतीपोटी अनेक मुले बराच काळ हे अत्याचार सहन करत राहिली.

हे ही वाचा : 'मित्रांनी प्राध्यापकासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरवल्या', डॉक्टर निकिताची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

'असं' बाहेर आलं प्रकरण

या लज्जास्पद प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा एका पीडित मुलाने धीर एकवटून आपल्या पालकांना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी इतर मुलांशी संवाद साधला असता, एकामागून एक धक्कादायक माहिती समोर आली. संतापलेल्या ग्रामस्थांनी तातडीने बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीला तपासात मुख्याध्यापक संतोष नामा हा प्रथमदर्शनी दोषी आढळला. या तपास समितीचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालनालयाला सादर करण्यात आला.

हे ही वाचा : आईला झाली दुसऱ्या लग्नाची घाई, 8 वर्षांच्या लेकीला फेकले रेल्वेखाली; धक्कादायक प्रकरण

मुख्याध्यापकाचे तात्काळ निलंबन 

तपास अहवालाच्या आधारे माध्यमिक शिक्षण संचालनालय, बिकानेरचे संचालक सीताराम जाट यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांनी आदेश जारी करत मुख्याध्यापक संतोष नामा याला तात्काळ निलंबित केले असून, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे. निलंबन काळात त्याचे मुख्यालय जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) करौली येथे निश्चित करण्यात आले आहे. हा मुख्याध्यापक दरवेळी एका नवीन मुलाला आपले शिकार बनवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता या नराधमाला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे, जेणेकरून भविष्यात विद्येच्या मंदिराला कोणीही असे कलंकित करू शकणार नाही.