Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका अडीच वर्षांच्या मुलाला खेळताना गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी मुलाच्या जखमेवर डाके घालण्याऐवजी त्यावर फेवीक्विक लावल्याची भयंकर बाब समोर आली. मात्र, मुलाला कालांतराने आणखी वेदना जाणवू लागल्या. गंभीर प्रकृती लक्षात घेऊन कुटुंबियांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी नेलं. त्यावेळी, त्या डॉक्टरांना मुलाच्या जखमेवरील फेवीक्विक काढण्यासाठी जवळपास तीन तास लागले. आता हे प्रकरण आरोग्य विभागापर्यंत पोहोचलं असून याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
अडीच वर्षीय मुलाचं नाव मनराज सिंग असल्याचं समोर आलं आहे. तो घरात खेळत असताना टेबलच्या कोपऱ्याला त्याचं डोकं आपटलं. यामुळे, मुलाच्या डोळ्याच्या अगदी वर मोठी जखम झाली आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होऊ लागला. मुलाला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीय सुद्धा खूप घाबरले आणि ते त्याला घेऊन जवळच्या खाजगी रुग्णालयात गेले.
टाके घालण्याऐवजी जखमेवर फेवीक्विक लावलं अन्...
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, जखमेवर टाके घालण्याऐवजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना 5 रुपयांची फेविक्विक आणण्यास सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या डोक्यावरील जखमी भाग फेविक्विकने सील केला. त्यावेळी, लहान चिमुकल्याला प्रचंड वेदना होत राहिल्या, खरं तर, डॉक्टरांनी त्या वेदना थोड्याच वेळात कमी होणार असल्याचं सांगितलं. परंतु, मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि त्याची प्रकृती आणखी खालावत गेली.
हे ही वाचा: Govt Job: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' मोठ्या पदांसाठी निघाली भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?
जखमेवरील फेवीक्विक काढण्यासाठी 3 तास लागले
दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय आपल्या मुलाला शहरातील प्रसिद्ध रुग्णालयात घेऊन गेले. मुलाच्या जखमेवर फेवीक्विक लागल्याचं पाहून तिथल्या डॉक्टरांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जखमेवरून ते फेवीक्विक काढणं अतिशय अवघड असून त्यासाठी त्यांना जवळपास 3 तास लागले. त्यानंतर, जखमेवरून फेवीक्विक पूर्णपणे काढल्यानंतर त्यावर टाके घालण्यात आले. तसेच, ते फेवीक्विक चुकून बाळाच्या डोळ्यात गेलं असतं तर डोळ्याला मोठा धोका उद्भवला असता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईतील 'या' मार्गावर धावणार मेट्रो! लाइन-11 ला मिळाला ग्रीन सीग्नल...
मेडिकल ऑफिसरला दिली माहिती
या घटनेने संतप्त कुटुंबियांनी मेरठचे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर (CMO)डॉ. अशोक कटारिया यांच्याकडे तक्रार केली. डॉक्टरांच्या मते, त्यांना घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली असून याच्या तपासासाठी एका समिती नेमण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, "कुटुंबियांकडून यासंबंधी तक्रार मिळाली आहे आणि समिती पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर, लवकरच सत्य उघडकीस येईल. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाणार आहे." मुलाच्या आईने डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबाबत प्रचंड संताप व्यक्त केला असून यामुळे मुलाच्या आरोग्याला मोठा धोका पोहचू शकला असता, असं ती म्हणाली.
ADVERTISEMENT











