Palghar teacher beats students for water delay children hide in forest , पालघर : जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेत येण्याऐवजी जंगलात लपून बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षक लोकनाथ जाधव यांच्या कथित मारहाणीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
झऱ्यावरुन विद्यार्थ्यांना पाणी आणण्यास सांगितले, पण उशिर झाला...
अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना (विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक आणि प्रमोद जंगली) शाळेपासून एक किलोमीटर दूर असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. अंतर जास्त असल्याने मुलांना परत यायला उशीर झाला. या कारणावरून शिक्षक जाधव यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मारहाणीचं हे दृश्य पाहताच उर्वरित विद्यार्थी घाबरून जंगलात पळाले आणि तिथेच लपून बसले. ही गंभीर बाब पंचायत समितीच्या प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पालक करत आहेत.
शाळेतील शैक्षणिक वातावरणावरही प्रश्नचिन्ह उभे राहत असून, शिक्षक जाधव यांच्या अनियमित कामकाजाबाबत देखील तक्रारी वाढल्या आहेत. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या 26 आहे. नियमित शालेय वेळ सकाळी 10:30 असतानाही शिक्षक जाधव हे नेहमी 11:30 वाजता शाळेत हजेरी लावतात, असे पालकांचे म्हणणे आहे. मुलांना अंगणात उभे करणे, शिकवण्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये रमणे, वारंवार उशिरा येणे आणि शनिवारी गैरहजर राहणे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हेही वाचा : अर्ज घातलं, भाजपच्या महिला उमेदवाराचं मराठी बोलण्यावरुन तुफान ट्रोलिंग, आता नितेश राणे म्हणाले..
उपसरपंच आणि मुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?
ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे म्हणाले, “शिक्षक लोकनाथ जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू.” स्थानिक पातळीवरही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, पालक व ग्रामस्थांनी एकत्र येत कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, “जांभूळमाथा शाळेतील शिक्षकाच्या वर्तनाची माहिती आम्हाला मिळाली आहे. संबंधित विभागाला सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
विद्यार्थ्यांचा सुरक्षितता आणि शिक्षणाचा हक्क धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण परिसरात या प्रकरणावर चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT










