जनगणना अधिकाऱ्यांना बघताच सटकली, काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं

जनगणना अधिकाऱ्यांना घरी घेऊन आल्याने आरोपी संतापला. त्याने थेट फायरिंगच केले. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:15 PM • 26 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

जनगणना अधिकाऱ्यांना बघताच सटकली,

point

काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या मुरादनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या घरी जनगणना अधिकाऱ्यांना घेऊन आल्याच्या रागातून एका व्यक्तीने थेट आपल्या शेजाऱ्यावरच गोळीबार केला. या गोळीबारात शेजारी गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मुरादनगरमधील आदर्श नगर कॉलनीत शनिवारी (23 मे) सकाळी ही थरारक घटना घडली.

हे वाचलं का?

शिवीगाळ आणि मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर कॉलनीमध्ये राहणारे प्रॉपर्टी डीलर वीरेंद्र त्यागी यांच्या घरी शनिवारी सकाळी जनगणना अधिकारी आले होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती नोंदवून घेतल्यानंतर, कॉलनीतील इतर घरांचा पत्ता दाखवण्यासाठी त्यागी यांच्याकडे मदत मागितली. वीरेंद्र त्यागी यांनीही शेजारधर्म पाळत अधिकाऱ्यांना घेऊन त्यांचे शेजारी रामपाल चौधरी यांचे घर गाठले. मात्र, जनगणना अधिकारी आपल्या दारात आलेले पाहून रामपाल चौधरी प्रचंड संतापले. त्यांनी वीरेंद्र त्यागी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली आणि काठी घेऊन अधिकारी व त्यागी यांच्या अंगावर धावून गेले. या गोंधळानंतर जनगणना अधिकाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी तिथून फरार झाला होता.

हे ही वाचा : प्रपोज केल्यानंतर तरुणीने नकार दिला, तरुणाच्या पचनी पडेना; थेट घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला

पोटात घातली गोळी

यानंतर, दुपारी बाराच्या सुमारास आरोपी रामपाल चौधरी पुन्हा वीरेंद्र त्यागी यांच्या घरी पोहोचला. त्याने घराचा दरवाजा ठोठावला आणि वीरेंद्र त्यागी यांनी दरवाजा उघडताच, रामपालने त्याच्या जवळील देशी बनावटीच्या पिस्तुलातून थेट त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी वीरेंद्र त्यागी यांच्या पोटात लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. जखमी त्यागी यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवले आहे. मुरादनगर पोलीस ठाण्याचे एसएचओ अंकित कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारीच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : मित्रानं कॉफी पाजली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?

देशभरात जनगणनेचे काम सुरु

दरम्यान, सध्या देशभरात जनगणनेच्या प्रक्रियेची तयारी सुरू असून अनेक भागांत अधिकारी घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती गोळा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अधिकारी गाझियाबादच्या या कॉलनीत पोहोचले होते. केंद्र सरकारने नुकतीच नवीन जनगणना प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली असून, याअंतर्गत लोकसंख्या, कुटुंब, शिक्षण, रोजगार आणि इतर सामाजिक-आर्थिक माहिती गोळा केली जात आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, ज्याचाच एक भाग म्हणून हे अधिकारी तिथे गेले होते.